नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : दोन वर्ष करोना निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना यंदा तरी दिवाळीत तेजी यावी अशी आशा असताना अनुकूल नसणाऱ्या सर्व घटकांवर मात करत ग्रामपंचायत निवडणुका दिवाळी सण साजरा करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या लाखोंची उधळपट्टी मतदारांसाठीही फलदायी ठरली आहे. निवडणुकीनंतर बाजारपेठेत दिवाळीनिमित्त खरेदीला आलेल्या उधाणातून याचा प्रत्यय येत आहे. 

जिल्ह्यातील सुमारे ७२ टक्के ग्रामपंचायतच्या निवडणुका १६ ऑक्टोबर रोजी पार पडल्या. विधानसभा निवडणुकीइतकीच या निवडणुकीची व्याप्ती होती. प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाल्याने निवडणुकीच्या व्याप्ती संपूर्ण गावाच्या कार्यक्षेत्रापर्यंत विस्तरित झाली व निवडणुकीचे स्वरूप, समीकरण व अर्थकारणात बदल झाले. शिवाय शिवसेनेत पडलेले फुटीमुळे बदललेले राजकीय गणिते व स्थानीय पातळीवर आघाडी उभारण्यासाठी झालेले प्रयत्न या दृष्टीने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. यंदा लांबलेला पावसामुळे शेतीची काम रखडलेली असून सर्व व्यवसायात व परिणामी व्यापारात आलेली मरगळ आली होती. यामुळे उद्योग समूह तसेच व्यापारी वर्ग चिंतेत होता. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात वितरित झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या निधीमुळे प्रत्यक्षात कामगारांचे बोनस होण्यापूर्वीच बाजारपेठेत झळाली आली.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीचा सण येण्याच्या दोन-तीन दिवसांपूर्वी बाजारपेठा गजबजलेल्या दिसून येत असत.  निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक आठवडा बाजारात खरेदीसाठी नागरिकांचा जणू मळा फुलाचे दिसून आले. दिवाळी निमित्ताने कपडे, ज्वेलर्स, मिठाई, फटाके, रोशनी व घरगुती वस्तू- उपकरणाच्या खरेदीला विशेष गर्दी झाल्याचे दिसून आले. पालघर जिल्ह्यात तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कृपेमुळे दिवाळीचा सण साजरा होण्यास मदत झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

५०० ते सात हजारांपर्यंत मतांची किंमत

ओबीसी जागा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून रिक्त झाल्यानंतर जिल्ह्यातील १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पैशाचा पाऊस पडला होता. यंदाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये पैशाची लालसा कायम होती. त्यामुळे लहान ग्रामपंचायतमध्ये ५०० रुपये ते तीन हजार तर मोठय़ा ग्रामपंचायत व चुरशीच्या लढती होणाऱ्या ठिकाणी चक्क एक हजार ते सात हजार रुपयांपर्यंत प्रत्येक मताची किंमत मोजली गेल्याचे दिसून आले. लहान गावातील सरपंचपदासाठी ज्या ठिकाणी एक किंवा दोन लाख रुपये खर्च अपेक्षित होता त्या ठिकाणी किमान पाच लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज असून चुरशीच्या ग्रामपंचायतींत प्रत्येक उमेदवाराकडून खर्च झालेली रक्कम ५० लाखांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोटय़वधी रुपये मतदारांपर्यंत थेट व अप्रत्यक्षपणे पोहोचले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar district occasion of diwali people rush to the market shopping ysh
First published on: 25-10-2022 at 00:02 IST