वाडा : पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा परतल्यास शेतकऱ्यांच्या भात कापणीला मोठा अडथळा येवून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मात्र निसर्गाच्या अनपेक्षित मारामुळे आर्थिक संकटात सापडल्याने चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान स्थिर झाल्यास कापणीची गती वाढू शकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतात उभे असलेले भातपीक आडवे झाल्याने भाताची मोठी नासाडी झाली. यामुळे शेतकरी राजा आधीच हवालदिल झाला आहे. यावर्षी भातपीक चांगल्या प्रकारे आले होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मात्र अचानक आलेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले बहुतांश भातपीक वाया गेल्याने उरलेल्या सुरलेल्या भातपिकावर समाधान मानण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. काही ठिकाणी करपा व बगल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळीतच सल्ला व भातपिकांवर उपचार मिळाल्याने एका संकटातून दिलासा मिळाला.
आता पुन्हा पावसाने जोर कायम ठेवल्यास भातकापणीच्या कामांमध्ये अडथळा येवून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि डहाणू तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. वाडा, विक्रमगड तालुक्यात यंदा एकूण जवळपास २३ हजार हेक्टर क्षेत्राच्या पुढे भातशेतीची लागवड झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर हे दोन महिन्याच्या अखेरीस सातत्याने (संततधार) पाऊस पडत राहिल्याने भातशेती पूर्णतः पाण्याखाली गेली होती. परतीच्या पावसामुळे वाडा, विक्रमगड या तालुक्यातील १७ ते १८ हजार शेतकऱ्यांचे जवळपास ४ हजार ५०० हेक्टरील कृषी पिकांचे (भातशेतीचे) नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीस कापणीची प्रक्रिया सुरू होते. मात्र यंदा परतीच्या पावसाने वेळेवर कापणी होऊ शकलेली नाही. वाडा, विक्रमगड तालुक्यात ऑक्टोबरचे सुरुवातीचे १५ दिवस उघाड मिळताच (पाऊस थांबताच ऊन मिळतातच) शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे.
वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द, आंबिस्ते बुद्रुक, खानिवली, निचोळे, कोनसई, कांबारा या भागांत कापणीला वेग पकडला आहे. आम्ही भात कापणी बरोबरच भारे बांधण्यास सुरुवात केली आहे. असे आंबिस्ते येथील शेतकरी तुषार सावंत यांनी सांगितले.
परंतु घोडमाळ, बोरांडा, पालसई अशा काही भागांत आजही भात शेतातच ओलसर असल्याने कापणी होवू शकत नाही. तर अनेक ठिकाणी कापणीसाठी भात कापून ठेवले आहे. मात्र भाताचे पीक पूर्णतः ओलसर झाल्याने पीक खराब (धान सडण्याची) शक्यता निर्माण झाली आहे.”
वसुरी बुद्रुक (घोडमाळ) येथील पांडुरंग सांबरे व बोरांडा येथील भाई पाटील यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने भातकापणी करायची कशी असे त्यांनी सांगितले.
शेती तज्ज्ञांचे म्हणणे
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. “शेतामध्ये पाणी साचल्याने कापणीला उशीर होतोय. यामुळे भाताच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पेरणी उशिरा झाली आणि आता कापणीही उशिरा होणार,” असे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.
सरकारकडून मदतीची मागणी
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई व विमा दाव्यांची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची प्रतिक्षा आहे. मदत लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.