बोईसर : पालघरमध्ये भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) जोरदार धक्का दिला आहे. माझी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला हा मोठा धक्का मानला जातो. शिंदे गटातून भाजपमध्ये घाऊक पक्षप्रवेशामुळे पुढील काळात महायुती मधील दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमधील धुसफूस अधिकच वाढीस लागण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय फोडाफोडीला वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) मधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, पूर्णिमा धोडी, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी राकेश रत्नाकर, सरावली चे सरपंच आनंद धोडी, शिरगावचे सरपंच घनश्याम मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुधीर ओझरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत प्रकाश निकम हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघांमधून इच्छुक होते, मात्र हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिल्याने निकम यांनी बंडखोरी करीत जिजाऊ संघटनेच्या सहकार्याने अपक्ष निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांच्याकडून निकम यांचा पराभव झाला. त्यापूर्वी २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपचा विष्णू सावरा यांच्याकडून त्यांचा थोडक्यात पराभव झाला. प्रकाश निकम यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असून २०२० मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत तारापूर गटातून ते विजय झाले होते. शेवटच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्यात आले होते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागात त्याने शिवसेना पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो.