पालघर : जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना अग्रक्रमाने हाती घेण्यात यावे, लोकसंख्या निहाय तसेच भेडसावणाऱ्या समस्याच्या अनुषंगाने विकास कामाला प्राधान्य द्यावे तसेच कोणत्याही तालुक्याला किंवा गट, गणाला विकास कामांच्या वितरणा दरम्यान डावलली जाऊ नये अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. त्याच बरोबरीने पालघर जिल्हा सुंदर व दुर्गंधी मुक्त करताना जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राडारोडा मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
मनोर-वाडा-भिवंडी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला असून मनोर येथे बांधकाम सुरू होऊन गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या वारली हाट प्रकल्पासाठी अतिरिक्त १० कोटी रुपये मंजूर झाल्याची त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रत्येकी पाच कोटी रुपयांची विकासकामे सुचवण्याची संधी देण्यात आली असून लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मान्यता देऊन या कामाला निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. असे करताना कोणताही तालुका अथवा भाग दुर्लक्षित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले.
विविध विभागाला मंजूर करण्यात आलेल्या रक्कमेचा विनीयोग विहित कालावधीत खर्च न झाल्यास त्याला संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याचे अपयश मानले जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे गणेश नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी सन २०२४- २५ जिल्हा नियोजन आराखड्यातील अंतिम सुधारणा तसेच विद्यमान आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन निधीची उपलब्धता तसेच झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन त्यामधील फेररचनेला मंजुरी या बैठकीत देण्यात आली. याच बरोबरीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणेबाबत केलेल्या सूचनांना देखील याप्रसंगी मंजुरी देण्यात आली.
याप्रसंगी विविध लोकप्रतिनिधी यांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्या तसेच जिल्हा विकास निधी मधून आपआपल्या कार्यसक्षेत्रात आवश्यक कामांची मागणी याप्रसंगी केली. लोकप्रतिनिधी यांनी मांडलेल्या समस्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवण्याच्या सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग राडारोडा मुक्त करणार
राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पासून पुढे येताना रस्त्याकडेला राडारोडा टाकण्याची प्रथा अजूनही सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने तसेच पुढे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सशुल्क राडारोडा विघटन केंद्र उभारण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी केल्या.
राष्ट्रीय महामार्गावर राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवून अशी वाहने विघटन केंद्रांवर न गेल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे अथवा वाहने जप्त करण्याची कारवाई पोलिसांच्या मदतीने करावी असे त्यांनी सूचित केले. ब्राझील व अन्य देशांमध्ये अशा प्रकारचा घनकचरा विल्हेवाट करण्यासाठी असणाऱ्या पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने प्रकल्प पुढील चार-पाच महिन्यात कार्यान्वित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा लगत मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आले असून घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच महामार्गालगतच्या भागाचे विद्रूपीकरण रोखून रचनात्मक सुधारणा व सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावी अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. या सर्व बॅनरची परवानगी तसेच मान्यता असल्यास त्यांची आकारमानाची तपासणी करून आवशयक परवानगी नसणाऱ्या होर्डिंग विरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले. याच बरोबरीने महामार्गावरील हॉटेल व त्या लगतच्या इतर दुकानदारांकडे येणाऱ्या ग्राहकांमुळे महामार्गावरील वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी महसूल व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.
वनविभागाकडून वृक्ष लागवड करण्याच्या सूचना
राज्यात पुढील पाच वर्षात २५० कोटी झाडे लावण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगाने झाडांची रोपे टिशू कल्चर च्या माध्यमातून पुणे, कोकण, मराठवाडा, खानदेश व विदर्भात तयार केली जात असून गडचिरोली जिल्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात एक कोटी झाडांची लागवड करावी अशा सूचना गणेश नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबरीने राष्ट्रीय महामार्ग व इतर प्रमुख मार्गांलगत नुसती हिरवळ उभी न राहता सप्तरंगाच्या फुलांची उधळण व्हावी, सुरंगी, बकुळी व रुद्राक्ष सारखी सुगंध पसरवणारी झाडांची लागवड व्हावी असेही त्यांनी सुचित केले. जिल्ह्यातील एक लाख झाडांच्या सोबतीने तलासरी, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या भागात असणाऱ्या वन विभागांच्या जमिनीत तसेच शासनाने दिलेल्या वनपट्ट्यांमध्ये किमान ५० लाख बांबू ची लागवड करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
काही महत्त्वपूर्ण घोषणा
जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेने प्रयत्न करायला हवेत असे सांगून यांनी नियंत्रक पद्धतीने गावठाण विस्तारांच्या दृष्टीने सर्व संबंधित सरपंचांकडून प्रस्ताव मागवण्याचे आवाहन केले. प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा अभ्यास करून आवश्यक गावठाण विस्तार करून प्लॉटिंग करून नव्याने निर्मित झालेल्या प्लॉटवर आवश्यकतेनुसार जागा वाटप करण्याचे त्यांनी सांगितले.
वाडा येथील जुन्या टायरवर पायरोलिसीस करून विघटन करणाऱ्या कंपन्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने तसेच इतर प्रदूषणकारी कारखान्यांविरुद्ध उद्योग बंद करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी असे हे त्यांनी सुचित केले. पालघर व माहीम दरम्यान वाहणाऱ्या पाणेरी नाल्यातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पाटबंधारे विभागाने उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या.
न झालेल्या रस्त्यांच्या कामांची एसआयटी चौकशी?
राज्य सरकारच्या यापूर्वीच्या कालखंडात ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने अनेक न झालेल्या रस्त्यांच्या कामांचे देयके अदा केल्याची माहिती आपल्याकडे विविध तक्रारींच्या माध्यमातून प्राप्त झाल्याचे गणेश नाईक यांनी या बैठकीत सांगितले. या सदर्भात आमदार राजेंद्र गावित व इतर लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत मार्गदर्शन करताना गणेश नाईक यांनी लोकप्रतिनिधी हे विकास कामांना जबाबदार असून यांनी या कथित गैरप्रकाराबाबत एसआयटी चौकशीची मागणी करण्या संदर्भात आपल्याला व मुख्यमंत्री यांना पत्र द्यावे असे सुचित केले.
तसेच आपणच एसआयटी चौकशी मागणीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घालणार असल्याचे त्यांनी या बैठकीत जाहीर केले. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील एका मोठ्या रस्ता उभारणी ठेकेदाराने शिवसेनेत प्रवेश घेतल्याने त्याचे पडसाद उमटल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर उपस्थितांमध्ये उमटली.