पालघर : पालघर शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील रस्त्यावर खड्डे पडले असून या चौकात एका बाजूला राजरोसपणे मासळी विक्री होत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालय संकुल तसेच राजकीय महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण होऊन या चौकात दुपारी व सायंकाळी तुफान वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे.

पालघर शहरातील नवली रेल्वे फाटक बंद करण्यात आले असून या फाटकावरील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या सर्व दुचाकी, चार चाकी व अवजड वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रवास करावा लागतो.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पश्चिमेच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण व असलेल्या झाडांमुळे अडथळे निर्माण झाले असून वाहनांना सहजपणे डाव्या बाजूला जाण्यासाठी मार्गिका उपलब्ध नाही. या चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालघर नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आली नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या चौकातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असून चौकात पावसामुळे मोठ्या आकाराचे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनांना चौक नेहमीपेक्षा अधिक काळ लागत असल्याने वाहतूक कोंडीची तीव्रता वाढली आहे. रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती गेल्या आठवड्यापासून करण्यात आली असून हा रस्ता गेल्या डिसेंबर २०२४ पासून हायब्रीड ऍन्यूटी योजनेअंतर्गत वर्गीकरण केल्याने त्यावर दुरुस्ती करण्यास नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने निरुत्साह दाखवलेला आहे.

विशेष म्हणजे या चौकात काही मासे विक्रेत्यांनी वळणावरील जागा ताब्यात घेतली असून मासळी खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक या चौका मध्ये आपली दुचाकी व इतर वाहन उभी करत असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांकडून अपघात होण्याची शक्यता संबोध आहे. याबाबत पोलिसांकडून किंवा नगरपरिषदेकडून या मासळी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याने शासकीय विभागातील उदासीनता दिसून येत आहे. याबाबत पालघर नगर परिषदेकडे विचारले असता संबंधित रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून पडणाऱ्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा रस्ता खड्डामय

पालघर जिल्हा मुख्यालय कडे जाणाऱ्या रस्त्यावर गोठणपूर नाका व त्यापूर्वीच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले अजून त्यावर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. यास रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीने भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या प्रक्रियेत रस्त्याचा भाग उघडून काढल्याने वाहतूक करण्यास तो भाग गैरसोयीचा ठरत आहे. वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभावामुळे पालघर कडून जिल्हा मुख्यालय व बोईसर कडे जाणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.