पालघर : रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व अधिक असल्याने मोखाडा तालुक्यासाठी कोण कोण रानभाज्या खात आहे आणि कोणी रानभाज्यांचे पूर्णपणे सेवन केले आहे याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात यावी. तसेच ज्या व्यक्तींनी पूर्ण रान माझ्या सेवन केल्या आहेत त्यांना बक्षीस देऊन रानभाज्यांचे महत्त्व वाढवू मोखाडा तालुका कुपोषण मुक्त होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्याचे आवाहन जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवा दरम्यान केले.
आदिवासी भागांतील रानभाज्या, रानफळे, वनौषधी आणि अन्नधान्य उत्पादनांना ‘शबरी नॅचरल’ या प्रीमियम ब्रँडद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवांचे आयोजन जिल्हाभर करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमधून स्थानिक महिलांच्या सहभागातून “रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव” २५ जुलै रोजी मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे पार पडला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार आणि परिवर्तन महिला संस्था, मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने, नुक्लिअस बजेट योजना २०२५-२६ (केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना) अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला आमदार हरिश्चंद्र भोये आणि प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार डॉ. अपूर्वा बासुर उपस्थित होते. यावेळी रानभाज्या व पारंपरिक खाद्यपदार्थांचे पोषणमूल्य आणि आरोग्यविषयक फायदे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी उपस्थितांना सांगितले. जुन्या पिढीचे आरोग्य त्यांच्या शुद्ध आहारामुळे सक्षम होते, असे सांगत त्यांनी अशा अन्नपदार्थांचा दैनंदिन जीवनात समावेश करून आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी महिलांनी सादर केलेल्या खाद्यपदार्थांचे आणि रानभाज्यांचे कौतुक करत जेवणात अधिकाधिक रानभाज्यांचे सेवन करण्यात यावे. ज्या व्यक्तींनी पूर्ण रानभाज्या सेवन केल्या आहेत, त्यांना बक्षिसे देऊन रानभाज्यांचे महत्त्व समाजात वाढवावे व मोखाडा तालुका ‘कुपोषणमुक्त’ होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलेल असे आवाहन केले.
उत्कृष्ट सादरीकरणाला प्रोत्साहन
या रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिलांना आमदार हरिश्चंद्र भोये आणि प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. या महोत्सवाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या महोत्सवामुळे आदिवासी भागातील पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच स्थानिकांना आर्थिक स्वावलंबनाची संधीही उपलब्ध झाली आहे.