पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण असणाऱ्या सातिवली उड्डाण पुलाच्या लगत सेवा रस्त्यांवर निर्माण झालेले खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने या सेवा रस्त्याच्या एकामार्गिकेच्या काँक्रीट करण्याचे काम पूर्ण केले असून दुसऱ्या मार्गीकेचे काम हाती घेतले आहे. सातिवली सेवा रस्त्याचे काम पुढील काही दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून दोन्ही सेवा रस्ते १५ जुलै पर्यंत कार्यरत होणे अपेक्षित आहे.
सातिवली उड्डाणपुलाचे काम मे अखरीस पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हे काम रेंगाळले. पाऊस पडल्याने सेवा रस्त्यावर मोठे खड्डे झाल्याने १५ ते ३० किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. त्यामुळे शिरसाड ते चिल्हार दरम्यानचा प्रवास करण्यास पाच ते सात तासांचा अवधी काही दिवस लागणारे नागरिकांमधील असंतोष उफळून आला होता.
सातिवली पुलाच्या सेवा रस्त्यांमध्ये असणारे खड्डे बुजवून त्यावर शीघ्र गतीने परिपक्व होणारे काँक्रीट (रॅपिड सेटलिंग काँक्रीट) ७०० मीटर लांबी च्या दोन मार्गीकांवर अंथरण्याचे हाती घेतले होते. वाहतूक कोंडीची समस्या तसेच कोसळणाऱ्या पावसामुळे हे काम पूर्ण होण्यास काहीसा विलंब लागला होता. दोन दिवसांपूर्वी सेवा रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न नियंत्रणात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने मुंबई ते सुरत मार्गीके वर सातिवली पुला लगतच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम ३ जुलैपासून हाती घेतले असून हे काम ६ जुलै पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गी के वरून १० जुलैपासून वाहतूक करणे शक्य होणार असून मुंबई सुरत वाहिनी वरील वाहतूक त्यानंतर पूर्णपणे सुलभ होईल अशी आशा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सुरत ते मुंबई रस्त्याच्या सातिवली पुलाच्या दुसऱ्या मार्गीकेचे काँक्रीटिटी करण्याचे काम ७ जुलै ते १० जुलै दरम्यान पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून या दुसऱ्या मार्गीके वरून १५ जुलै नंतर वाहतूक सुरू करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे सातिवली पुलाच्या दुतर्फा असणाऱ्या सेवा रस्त्यांचे काम १५ जुलै पर्यंत पूर्ण होऊन या भागात निर्माण होणारी वाहतूक समस्या पूर्णपणे सुटेल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी लोकसत्ताला सांगितले.
पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची उद्दिष्ट
सातिवली पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात घेतल्यानंतर पुलावर असणारी रेती माती व खडी पसरवून त्यावरून हलक्या वाहनांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. सद्यस्थितीत पुलावरून दुतर्फा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असून सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचा अंदाज घेत पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.