पालघर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटी प्रशासनाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत या विशेष मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रशासनाकडून पास वाटप सुरू झाले आहे. ३० जून पर्यंत १०० टक्के पास वाटप करण्याचा संकल्प एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
शाळा ते घर हा विद्यार्थ्यांनी कमी खर्चात प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे. १ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार १६ जून पासून एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटीचे त्रैमासिक पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. या अभिनव योजनेचा मागील वर्षी १४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता.
पालघर जिल्ह्यात ४२५ बसगाड्या असून यातील २१० शालेय बस आहेत. यामध्ये दररोज १६ ते १७ हजार विद्यार्थी शाळेत ये जा करतात. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. शालेय प्रवासासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. यामध्ये मुलांना ३३ टक्के रक्कम भरून पास काढता येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना विनामूल्य एसटी पासचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत १२०४ विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर पास वितरण करण्यात आले आहे. तर ६४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पास वितरित करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, वाडा यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत लांब पल्ल्याच्या शाळा गाठाव्या लागत असत. तसेच प्रवासासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च सुद्धा त्यांना परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येण्यास कंटाळतात. त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या या योजनेद्वारे वेळ वाचणार असून आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. तसेच ‘लालपरी’ने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतच एसटी बसचा पास मिळत असल्याने विद्यार्थ्यांची पायपीट थांबली आहे.
शाळा महाविद्यालयांकडून पुरवली जाते यादी
या प्रक्रियेसाठी सर्व शाळा मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य यांना आपल्या विभागातील संबंधित एसटीच्या आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते. शाळेतील किती विद्यार्थ्यांना शालेय बसचा लाभ घ्यायचा आहे याची यादी तयार झाल्यावर परिवहन महामंडळाकडे तसे कळवावे. शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटीचे त्रैमासिक पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
दोन वर्षापासून विद्यार्थ्यांची पाससाठी फरफट थांबली
विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया जात होता. तसेच काही वेळा शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी होत होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होते. पण शासनाच्या या योजनेमुळे मागीलवर्षी पासून पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नसल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच पास वाटप सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही शाळांमध्ये शालेय बस हव्या असतील त्या शाळांनी परिवहन विभागाकडे पत्र पाठवून शालेय बसची मागणी करावी. तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या पासचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. – कैलास पाटील, विभाग नियंत्रक पालघर