वाडा : वाडा येथील एका नागरिकाची भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय योना ॲपद्वारे ५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती, त्यापैकी तब्बल ४ लाख ९५ हजार रुपये १० तासात परत मिळवून देत वाडा पोलिसांनी सायबर गुन्हेगारी विरुद्धच्या लढ्यात मोठे यश संपादन केले आहे.

वाडा शहरातील आगर आळी येथील भास्कर दामोदर जाधव (५५ वर्षे) यांनी १३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या एसबीआय योना ॲपला अपडेट करण्यासाठी गुगलवर ‘Yono app update-2025’ असे सर्च केले. त्यानंतर त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने (स्कॅमर) योना ॲप अपडेट करण्याबाबत माहिती दिली आणि श्री. जाधव यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका एपीके (APK) फाईलची लिंक पाठवली. ती डाऊनलोड करून फॉर्म भरण्यास सांगितले.

भास्कर जाधव यांनी तो फॉर्म अर्धवट भरला आणि त्यांना संशय आल्याने त्यांनी तो भरणे थांबवले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील योना ॲप उघडले नाही. त्यांनी एसबीआय कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांचे योना ॲप २४ तासांसाठी लॉक झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. याच दरम्यान पुन्हा स्कॅमरने त्यांना फोन करून, “तुमचे ॲप उघडत नसेल, तर तो अर्धवट भरलेला फॉर्म पूर्ण भरा आणि मोबाईल नंबर टाका,” असे सांगितले. श्री. जाधव यांनी ते पूर्ण केले.

यानंतर स्कॅमरने पुन्हा फोन करून पासवर्ड जनरेट होत नसल्याचे सांगत, व्हॉट्सॲपवर कॉल येईल आणि त्यात पासवर्ड जनरेट करण्याची प्रक्रिया सांगितली जाईल, असे सांगितले. श्री. जाधव यांनी तो व्हॉट्सॲप कॉल उचलताच, त्यांच्या एसबीआय योना ॲपमधून पैसे अनोळखी खात्यांवर हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली. अनुक्रमे १,९५,००० रुपये, १,८०,००० रुपये, १,२०,००० रुपये आणि ५०,००० रुपये असे एकूण ५,४५,००० रुपये त्यांच्या खात्यातून वळवण्यात आले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भास्कर जाधव यांनी तात्काळ वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड यांच्या मदतीने तातडीने कार्यवाही केली. सायबर गुन्हेगारीमध्ये ‘गोल्डन अवर’ (पहिला एक तास) अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण या वेळेत बँकेच्या व्यवहारांना थांबवणे शक्य होते.

पोलिसांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तात्काळ तक्रार दाखल केली. त्याचबरोबर एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरला कळवून संशयित आरोपीच्या खात्याचे व्यवहार अगदी १५ ते २० मिनिटाच्या आत थांबवले. तांत्रिक मदतीच्या सहाय्याने तपास करत श्री. जाधव यांच्या खात्यातून स्कॅमरच्या खात्यावर ट्रान्सफर झालेल्या ५,४५,००० रुपयांपैकी ४,९५,००० रुपये अवघ्या १२ तासांच्या आत भास्कर जाधव यांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी बाणे, पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे, पोलीस शिपाई चेतन सोनावणे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोउपनि रुपाली गुंड, पोशि रामदास दुर्गेष्ट आणि पोशि महादेव सांगवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून काळजी घेण्याचे आवाहन वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी केले आहे.