बोईसर : पालघर तालुक्यातील प्रस्तावित मुरबे बंदराविरोधात तारापूर येथील जेएसडब्ल्यू कंपनीसमोर संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. बंदर प्रकल्पाला स्थगिती किंवा बंदर कायमचे रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सहा ऑक्टोंबर रोजी पालघर खारेकुरण रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात मुरबे बंदरासाठी जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जन सुनावणीबद्दल विश्वासात घेतले गेले नसल्याचे कारण देत तसेच पर्यावरणीय अहवाल अपूर्ण असल्याचे सांगत बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवित जन सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

बंदराला विरोध करण्यासाठी मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीतर्फे मुरबे आणि सातपाटी येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे शनिवारी तारापूर एमआयडीसीतील जेएसडब्ल्यू कंपनी समोर आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना दिले.

रविवारी मुरबे येथील समुद्राच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रस्तावित जेएसडब्ल्यू मुरबे बंदरास स्थानिकांचा प्रखर विरोध असून परिसरातील सर्व ग्रामपंचायतीनी बंदराच्या विरोधात ग्रामसभेचे ठराव मंजूर केले आहेत. प्रस्तावित बंदरामुळे खोल समुद्रातील मासेमारी आणि नौकानयनाचा मार्ग बाधित होऊन मच्छीमारी संपुष्टात येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्यामुळे किनारपट्टीवरील गावात समुद्राच्या भरतीचे पाणी घुसून नुकसान होण्याची चिंता सतावत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नवीन रस्ते, रेल्वे मार्ग, गोदामे, कंटेनर यार्ड, कार्गो हब यासाठी मोठ्या प्रमाणात शेत जमीन संपादित करण्यात येऊन झाडांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने बंदराला स्थगिती किंवा कायमचा रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

पालघर तालुक्यातील मुरबे येथील समुद्र किनाऱ्यालगत जेएसडब्ल्यू या खाजगी उद्योग समूहमार्फत बारमाही हरीत बंदराची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे १०६५ एकर जागेवर भराव करून हे बंदर बांधण्यात येणार आहे. अंदाजे १९९६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारे बंदर २०२९ सालापर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.