शिवसेनेला जागा राखण्याचे आव्हान

जिल्ह्यातील २९ जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीचे नऊ अशा ११ जागांवर निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक

पालघर : पालघर जिल्ह्य़ात  ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक जागा पालघर तालुक्यात लढविल्या जाणार आहेत. यामध्ये शिवसेनेला या २९ जागांपैकी ११ जागा राखण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यातील २९ जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीचे नऊ अशा ११ जागांवर निवडणूक होणार आहे. डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार तर पंचायत समितीच्या दोन जागांवर लढत होणार आहे. वाडा येथे जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक पाच जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.  पंचायत समितीची एका जागेवर लढत  आहे.  मोखाडा येथे जिल्हा परिषदेच्या दोन तसेच विक्रमगड व तलासरी येथे जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एक  तर वसई तालुक्यात पंचायत समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.

सदस्यत्व रद्द झालेल्या सभासदांमध्ये शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद तर आठ पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सदस्य, भाजपचे चार जिल्हा परिषद व एक पंचायत समिती सदस्य तर कम्युनिस्ट पक्षाचा एक जिल्हा परिषद सदस्याचे सदस्यत्व रद्दबातल ठरले आहे. या खेरीज या पोटनिवडणुकीत मनसेचे दोन पंचायत समिती सदस्यांचे तर एका जागेवर बहुजन विकास आघाडीच्या सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

प्रमुख राजकीय पक्ष्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक  झाल्यानंतर गेल्या दीड वर्षांच्या काळात अंतर्गत राजकारण व गटबाजी उफाळून आली असून काही पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष पद बदलण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्याचप्रमाणे आघाडीच्या घटक पक्षांमधील अंतर्गत वादविवाद पुढे आले आहेत. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली तर आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांंकडून पाडापाडीचे राजकारण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते.  या पार्श्वभूमीवर घटक पक्षातील काही नेते ही पोटनिवडणूक मैत्रीपूर्ण पद्धतीने स्वतंत्रपणे लढवावी अशा मतप्रवाहाचे आहेत.  दुसरा गट स्वतंत्रपणे निवडणूकोढविल्यास व मतविभागणी झाल्यास त्याचा लाभ भाजपला होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. २० सप्टेंबपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून तोपर्यंत निवडणूक लढवण्या संदर्भात निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.  दरम्यान सर्व रिक्त जागांवर भाजप इतर मागास समाजाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविणार  असल्याची घोषणा केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक

या निवडणुकीसाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तलासरी तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, डहाणू तालुक्याकरिता साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, विक्रमगड तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी प्रियंका पाटील,  मोखाडा तालुक्याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंग, वाडा तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, पालघर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर तर वसई तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन दाखल नाही

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. या निवडणुकीत इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावायचे असून नंतर आवश्यक प्रतिज्ञा पत्रकांसह अर्जाची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. २० सप्टेंबपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena challenged to retain the seat ssh