पालघर: बहुप्रतिक्षित नैऋत्य मान्सून अखेर पालघर जिल्ह्यातून परतला आहे. आज, १० ऑक्टोबर रोजी उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या भागांतून मान्सून पूर्णपणे परतल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतपणे जाहीर केले आहे. यामुळे पुढील पाच दिवस पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सून परतल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होऊन ते २० ते २२ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

तापमानात होणाऱ्या या अचानक वाढीमुळे हवेतील आर्द्रतेत (दमटपणा) वाढ दिसून येईल. सकाळची आर्द्रता ९९ ते १००% पर्यंत राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना उष्ण व दमट हवामानाचा अनुभव येईल. तसेच, वाऱ्याची गती ५ ते ६ किमी प्रति तास राहण्याचा अंदाज कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान तज्ञ रिझवाना सय्यद यांनी वर्तविला आहे.

शेतकऱ्यांसाठी भात कापणी आणि बागेच्या स्वच्छतेचा सल्ला

पुढील दोन दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी शेतकरी बांधवांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मान्सूनच्या एक्झिटमुळे पालघरमधील हवामानात मोठे बदल होणार असून, नागरिकांनी उष्ण व दमट हवामानाला तयार राहावे, तसेच शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची कामे पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भात कापणी: शेतकऱ्यांनी भात कापणीसाठी यंत्राचा उपयोग करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होईल.

धान्य साठवणूक: कापणीनंतर मळणी केलेले धान्य साठवणीपूर्वी २ ते ३ उन्हे देऊन चांगले वाळवावे, जेणेकरून साठवणुकीत ते खराब होणार नाही.

फळ बागेची निगा: फळ बागेतील वाळलेल्या फांद्या व खाली गळालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच, बागेची साफसफाई करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या रोपांच्या खोडाखालील अनावश्यक फुट काढून टाकावी.

जनावरांची काळजी: सध्याच्या उष्ण व दमट वातावरणामुळे जनावरांच्या शरीरावर गोचीडांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता राखावी, जेणेकरून जनावरे निरोगी राहतील.