पालघर :खरीप हंगाम १५ जून पासून सुरु होणार असून त्यादृष्टीने विकसित कृषी करण्यासाठी खरीप नियोजन, जमिनीचे आरोग्य कसे राखावे व मशागत कशी करावी याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी खरीप हंगाम पूर्व विकसित कृषी संकल्प अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी योग्य वाणांची निवड करून अधिक उत्पादन मिळवावे याकरिता पालघरच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यात खरीप हंगाम भात बियाणे वाटपाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते पार पडला.

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्यावतीने विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून २९ मे ते १२ जून दरम्यान खरीप हंगामपूर्व विकसित कृषी संकल्प अभियान सुरू आहे. याचे औचित्य साधून पालघरच्या कृषी विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत आहे. २८ मे रोजी पालघर जिल्हा परिषद अंतर्गत खरीप हंगामासाठी भात बियाणे वाटपाचा शुभारंभ पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, जिल्हा कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गटविकास अधिकारी (प्र.) बापुराव नाळे आणि कृषी विभागातील अधिकारी तसेच अनेक शेतकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.

२९ मे पासून सुरु झालेल्या विकसीत कृषी संकल्प अभियानाद्वारे गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी, शासकीय योजना, आधुनिक कृषी तंत्रज्ञान विषयी जागरूकता मोहीम कृषी तज्ञा तर्फे राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे केंद्रीय मत्स्य विज्ञान संस्था मुंबई येथील शास्त्रज्ञ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, आत्मा व कृषी विभाग पालघर, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी तसेच गाव पातळीवर ग्रामसेवक सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा व शासकीय योजनाविषयी माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर आणि प्रकल्प संचालक, आत्मा विनायकराव पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

भात बियाणे वाटप उपक्रमात मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वसई, वाडा या पंचायत समिती कार्यालयांमध्ये भात बियाणे पोहोचले असून वाटप सुरू झाले आहे. जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत ४९ लाख रुपयांच्या योजनेंतर्गत महाबीजकडून ८४६ क्विंटल आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून ९३४ क्विंटल अशा एकूण १७८० क्विंटल भात बियाण्यांची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ५० टक्के निधी लाभार्थी शेतकऱ्यांकडून तर ५० टक्के जिल्हा परिषद सेस फंडामधून भागवला जात आहे.

यामध्ये कर्जत ३, कर्जत ५, कर्जत ७, सुवर्णा, एमटीयू १०१०, को ५१, एमटीयू ११५३, कर्जत ९, आरटीएन-६, आरटीएन-७ या सुधारित वाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. अंदाजे ५५०० ते ६००० शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत थेट लाभ मिळणार आहे.

दररोज सहा गावांना भेटी

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड, वाडा, वसई, जव्हार, मोखाडा तालुक्यातील ९० गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांमध्ये कृषी रथ जाणार असून दररोज सहा गावांना भेटी देऊन शास्त्रज्ञ व अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहेत.

अभियानाचे उद्दिष्ट

खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पिकांची निवड, मृदा आरोग्य पत्रिकांची माहिती, नैसर्गिक शेती व संतुलित खतांचा वापर यावर मार्गदर्शन होणार आहे. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा आणि अधिक उत्पादन मिळवावे. तसेच शेतकऱ्यांनी योग्य वाणांची निवड करून शेतीत भरघोस उत्पन्न घ्यावे. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी