डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरातील एका अपघात प्रवण क्षेत्रात प्रवासी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात बोरिवली येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
दमण येथून कौटुंबिक कार्यक्रम आटपुन बोरिवली (आयसी कॉलनी) येथे परतत असताना आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मनोर गेट हॉटेल समोर हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई कडे येणाऱ्या वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवासी कार चालकाने डोंगराच्या उतारावर असणाऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाने कारला मागून धडक दिल्यामुळे कार दोन वाहनांच्या मध्ये चिरडून कार मधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात ग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कटरचा व क्रेन चा वापर करावा लागला.
या अपघातामध्ये वाहन चालविणारे क्लायटोन वल्लेस (४३), त्यांची पत्नी फबोलिया वल्लेस (४५) व आई ग्लोरिया वल्लेस (७३) या तिघांचा मृत्यू झाला असून वडील हेनन वल्लेस व नऊ वर्षीय रेडन हे दोघे जखमी झाले असून मनोर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मृत्यांचे शवविच्छेदन मनोर ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात येणार आहेत.