बोईसर : पश्चिम रेल्वे मार्गावरील वैतरणा ते डहाणू पट्ट्यातील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या विरार डहाणू उपनगरी रेल्वे चौपादरीकरण कामाला गती मिळाली आहे. सध्या या मार्गाचे ४१ टक्के स्थापत्यकाम पूर्ण झाले असून पुढील दोन वर्षात चौपदरीकरणाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचा दावा मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते डहाणू या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई विरार भागात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. या मार्गावर दर दिवशी दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असताना वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपनगरी गाड्यांची संख्या मर्यादित आहे. सध्या चर्चगेट विरार डहाणू उपनगरी मार्गावर ३१ लोकल, शटल आणि पॅसेंजर गाड्या धावत आहेत. मात्र अपुऱ्या सेवेमुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीत जीवघेणा प्रवास करावा लागत असून उपनगरी सेवेत वाढ करण्याची मागणी होत आहे. मात्र विरार ते डहाणू हा रेल्वे मार्ग दुहेरी असल्याने आणि गुजरात, राजस्थान, दिल्लीहून ये जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पुढे जाण्यास प्राधान्य मिळत असल्याने या मार्गावर लोकलची संख्या वाढवण्यास मर्यादा येत असल्याचे पश्चिम रेल्वे विभागाचे म्हणणे आहे.
पालघर जिल्ह्यातील वैतरणा ते डहाणू पर्यंतच्या पट्ट्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा याकरिता विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. मुंबई महानगर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी ३) अंतर्गत रेल्वे चौपदरीकरणाचे काम सुरू असून ३५७८ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत चौपदरीकरणाचे ४१ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणांमध्ये विरार ते डहाणू रोड पर्यंत ६४ कीमी अंतरात दोन वाढीव रेल्वे मार्गिका, विद्युत आणि सिग्नल यंत्रणा, वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू या रेल्वे स्थानकांच्या नवीन इमारती आणि फलाट, पादचारी पूल बोईसर येथील मालवाहू यार्ड इत्यादी कामांचा समावेश असून यापैकी दोन वाढीव रेल्वे मार्गिकांसाठी माती भरावाचे काम प्रगतीपथावर आहे. तर रेल्वे स्थानकांच्या नवीन इमारती आणि मालवाहू यार्ड यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
२०१८ मध्ये एमयूटीपी ३ अंतर्गत मंजुरी मिळालेल्या विरार ते डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचा मोठा अडथळा होता. वनजमिनी सोबतच खारफुटीच्या जंगलाचे संपादन करावे लागणार होते. केंद्रीय वनविभागाकडून पर्यावरणीय परवानगी मिळवण्यासाठी अधिक वेळ लागल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते. चौपदरीकरणासाठी २.१८ लाख क्युबिक मीटर मातीचे खोदकाम करून २३.५ लाखो पिक मीटर माती भराव करण्यात आला आहे. या मार्गावरील ५३ पूल आणि भुयारी मार्गांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. वैतरणा खाडीवरील दोन आव्हानात्मक पुलांचे बांधकाम सुरू आहे.
विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण मार्गाची वैशिष्ट्ये:
एकूण लांबी : ६४ किमी
मुंबई महानगर वाहतूक प्रकल्प,एमयुटीपी ३ अंतर्गत मंजुरी
प्रकल्पासाठी येणारा अंदाजित खर्च: ३५७८ कोटी
कामाची सद्यस्थिती : ४१ टक्के स्थापत्य काम पूर्ण
भूसंपादन: ५६ हेक्टर जागा (२९.१७ हेक्टर खाजगी,१०.२६ सरकारी,३.७७ वन आणि १२.८ एनपीसीआयएल)
एकूण पूल आणि भुयारी मार्गांची संख्या: ५३
चौपदरीकरण पूर्ण होण्याची अंदाजित मुदत : जून २०२७ पर्यंत