कासा : डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील ऐतिहासिक भीम बांधावर गुरुवारी दुर्दैवी घटना घडली. पाण्यात बुडालेल्या महिला पर्यटकाचा मृतदेह तब्बल १८ तासांच्या शोधानंतर शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यात आला. मीना पराड (वय ३९, रा. धानिवरी, डहाणू) असं मृत महिलेचं नाव असून, त्या कुटुंबासह पर्यटनासाठी भीम बांधावर आल्या होत्या.

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मीना पराड यांनी भीम बांधाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरली असता. पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या काही क्षणांतच खोल पाण्यात ओढल्या गेल्या. घटनेनंतर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि पाणबुड्यांनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. शुक्रवारी सकाळी अखेर मृतदेह सापडला असून तो स्वविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

पर्यटनस्थळ, पण सुरक्षा शून्य

भीम बांध हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून दररोज येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्यानं हे ठिकाण धोकादायक बनलं आहे. बांधाच्या खाली खोल आणि वेगवान प्रवाह असून अंदाजे ४० ते ५० फूट पाणी असल्याचं स्थानिक सांगतात. तिथे कुठलाही सूचना फलक, जीवरक्षक, सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही.

अनेक अपघात, तरीही दुर्लक्ष

या अपघातापूर्वीही भीम बांधावर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांच्या बुडून मृत्यूच्या घटना इथे नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अजूनही सुरक्षा यंत्रणा विकसित केलेली नाही. स्थानिक ग्रामस्थांकडून आता जोरदार मागणी करण्यात येत आहे की, या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारली जावी, सूचना फलक लावले जावेत, आणि जलरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

पर्यटन हक्काचं, पण सुरक्षिततेसोबतचं हवं

निसर्गसंपन्न ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनानेही अशा लोकप्रिय स्थळांवर जबाबदारीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरवर्षी महालक्ष्मी यात्रेच्या वेळी तसेच उन्हाळी सुट्टी मूळे पालघर सह नाशिक , गुजरात , सिलवासा या भागातून सूर्या नदीवर भीमाने बांधलेल्या बांधावर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच या भीम बांधाची अख्यायिका ऐकून अनेक पर्यटक या भीम बांधावर येत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात परंतु बऱ्याच पर्यटकांना पाण्याचा खोलीचा अंदाज माहित नसल्यामुळे दरवर्षी या बाहेरून येणाऱ्या किंव्हा परिसरातील पर्यटकांचा बुडून अपघाती मृत्यू झाल्याचे घटना घडत आहेत. याकरिता या पर्यटन स्थळी कायमस्वरूपी ग्रामपंचायत मार्फत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या जेणेकरून अशा होणाऱ्या घटनेला आळा बसेल .परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारच्या सुचानफलक लावल्या जातात मात्र या ठिकाणी काही मद्य प्राशन करणाऱ्या पर्यटकांकडून असे सूचना फलक तोडून टाकण्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे वाघाडी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून सांगण्यात येत आहे.