
यावेळी आयपीएलमध्ये अनेक तरुण आणि नवख्या खेळाडूंनी दिमाखदार खेळ करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याच कारणामुळे निवड समितीकडून इंग्लंडसोबतच्या टी-२० मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडू तर दक्षिण आफ्रिका आणि आर्यलँडसोबतच्या मालिकेसाठी तरुण खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
आयपीएल २०१७ मध्ये पदार्पण केलेल्या राहुल त्रिपाठीने या हंगामात धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत ३९३ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने तीन वेळा अर्धशतकं झळकावले आहेत.
या हंगामात पदार्पण केलेल्या मोहसिन खान हा खेळाडूदेखील चांगली गोलंदाजी करत आहे. तो सध्या लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळत असून त्याने आठ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा दिनेश कार्तिक चांगलाच चमकला आहे. जेव्हा-जेव्हा बंगळुरु संघ अडचणीत आलेला आहे, तेव्हा-तेव्हा कार्तिकने धमाकेदार खेळ करुन दाखवलेला आहे. त्याने आतापर्यंत २८५ धावा केल्या असून यापैकी तो आठ वेळा नाबाद राहिलेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी भारतीय संघामध्ये त्याला स्थान दिले जाऊ शकते.
पंजाब किंग्जकडून खेळणारा अर्शदीप सिंग यावेळी चांगलाच चमकला आहे. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांत दहा विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगलाही यावेळी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
मुळचा जम्मू काश्मीर येथील वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांमध्ये समावेश आहे. याच कारणामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते.
गुजरात टायटन्स संघाकडून खेळणारा राहुल तेवतीयादेखील फिनिशर म्हणून समोर आला आहे. त्याने ११ सामन्यांत ५ वेळा नाबाद राहत २१५ धावा केलेल्या आहेत. राहुल तेवतीयालाही भारतीय संघात स्थान मिळण्याची वाट पाहत आहे.