इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसोबत आम्ही सांगून थकलोय, असे म्हणत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक यांनी गुरुवारी आसामच्या १४ लोकसभा जागांपैकी तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले. याचवेळी इंडिया आघाडीबरोबर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आप’ने पक्षाची सत्ता असलेल्या दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांतून अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यापूर्वी आसाममध्ये ‘आप’ने कोणतीही संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवलेली नाही.

भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली, ज्यानंतर आसाम येथील विरोधी पक्षांनी राज्यातील सर्व १४ लोकसभेच्या जागांवर एकमताने उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. आसाम येथील इंडिया आघाडीतील काँग्रेस, टीएमसी, आरजेडी, सीपीआय (एम), सीपीआय, अखिल गोगोई यांचा रायजोर दल आणि लुरिनज्योती गोगोई यांच्या आसाम राष्ट्रीय परिषद या प्रादेशिक पक्षांनी अद्याप राज्यात उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आसाममधील १४ विद्यमान खासदारांपैकी नऊ खासदार भाजपाचे आहेत, तर तीन काँग्रेस, एक ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि एक अपक्ष खासदार आहे.

गुरुवारी आपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक यांनी अधिकृत घोषणा केली. या घोषणेत गुवाहाटीचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष भाबेन चौधरी, दिब्रुगढचे उमेदवार म्हणून राज्य उपाध्यक्ष मनोज धनोवर आणि सोनितपूरचे उमेदवार म्हणून राज्य संघटन सचिव ऋषिराज कौंडिंया यांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करून या तीन जागांवर दावा केल्यावर, इंडिया आघाडीतील मित्र पक्ष या तीन जागा आपला देतील अशी आशा व्यक्त केली.

“आमच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे… म्हणूनच लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आसाममधून तीन उमेदवारांची घोषणा करत आहे… आम्ही आता या तीन जागांवरून पूर्ण ताकदीने तयारी सुरू करू आणि मला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडी या तीन जागा ‘आप’ला देईल,” असे पाठक म्हणाले.

निवडणूक जिंकायची असेल, तर रणनीती आखणे महत्त्वाचे

“इंडिया आघाडीशी जागावाटपावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चर्चा करून महिने होत आले, आता सांगून थकलोय. आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत, निवडणुका जिंकायच्या आहेत. जेव्हा तुम्ही युती करता आणि तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल, तर यासाठी वेळ आणि रणनीती आखणे खूप महत्त्वाचे ठरते. आता सांगून सांगून आम्ही थकलोय. आम्ही भक्कमपणे इंडिया आघाडीबरोबर आहोत, पण निवडणूक जिंकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व निर्णय त्वरित व्हायला हवे. जितके लवकर हे निर्णय होतील, तितकी जिंकण्याची शक्यता जास्त असेल”, असे त्यांनी सांगितले.

आसाम येथील आपचे उपाध्यक्ष म्हणाले की, आप राज्यातील इतर ११ जागांवर इंडिया आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास तयार आहे. “आम्ही इंडिया आघाडीच्या विरोधात जात आहोत असे नाही. आम्ही फक्त तीन जागांवर निवडणूक लढवणार आहोत… आम्ही इतर सर्व ११ जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ, ” असे ते म्हणाले.

हेही वाचा : पाकिस्तानातलं घराणेशाहीचं राजकारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसाम काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा यांची राज्यातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात मोठी भूमिका राहिली आहे. त्यांनी आसाममधील सर्व जागा इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसोबत समजुतीतून लढल्या जातील अशी आशा व्यक्त केली. “आसाममध्ये इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपाविरोधात लोकसभा आणि पुढील विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा ठराव होता… राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही आमच्या राष्ट्रीय नेतृत्वावर अवलंबून आहोत. भाबेन चौधरी यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत, परंतु आपने आसामसाठी त्यांच्या बाजूने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, मी याबद्दल फार काही सांगू शकत नाही” असे ते म्हणाले.