राजेश्वर ठाकरे

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होताना आपली वेगळी ओळख जपण्याचा नागपूरकर काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. पूर्व नागपुरातील कार्यकर्ते कुर्ता आणि पायजमा आणि गांधी टोपी घालून यात्रेत सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रा विदर्भात येण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तयारीला वेग आला आहे. यात्रेत आपली वेगळी ओळख असावी यादृष्टीनेही कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. पूर्व नागपुरातील ३५० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासाठी कुर्ता, पायजामा आणि गांधी टोपी असा ‘ड्रेस कोड’ निश्चित करण्यात आला आहे. सेवादलाने त्यांच्या कार्यकर्त्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी स्वत: टी शर्ट घालून पदयात्रा करीत आहेत. इतरांनाही पोशाखाबाबत कोणतेही बंधन नाही. मात्र कार्यकर्त्यांनी आपली वेगळी ओळख ठेवण्यासाठी कुर्ता-पायजामा आणि गांधी टोपी घालून यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी एकसारखा टी-शर्ट घालण्याचे ठरवले. यात्रेच्या संदर्भात झालेल्या बैैठकीत यावर चर्चाही झाली. नागपुरातील कार्यकर्त्यांना अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे यात्रेत सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही कार्यकर्ते शेगाव येथील जाहीर सभेत उपस्थित राहणार आहेत.आमदार ॲड. अभिजीत वंजारी म्हणाले, यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलुर येथे सोमवारी रात्री दाखल झाली.‌ या यात्रेत १८ आणि १९ नोव्हेंबरला नागपुरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील अडीच ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पूर्व नागपुरातील ब्लाॅक अध्यक्षांनी ३५० कार्यकर्त्यांची यादी दिली असून त्यांच्यासाठी वाहने आणि गांधी टोपीची व्यवस्था केली आहे.