पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत ५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी २० एप्रिल रोजी झाली. छाननीमध्ये पाच अर्ज बाद होऊन ४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर सोमवारी (२२ एप्रिल) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत होती. त्यामध्ये आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये शेख यांनी पसंतीमध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह शेख यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे आहे. त्यामुळे शेख यांना देण्यात आलेल्या चिन्हावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या शेख यांनी मुक्त चिन्हांसाठी असलेल्या चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. पसंतीक्रमानुसार त्यांचा पहिला पसंतीक्रम तुतारी होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार शेख यांना हे चिन्ह देण्यात आले.