अमरावती : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफी आंदोलनासाठी पूर्वतयारी चालवली आहे. येत्या २८ ऑक्टोबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, सर्व कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करणे, गाव एकक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना, खते- बियाणांच्या तपासणीसाठी गावपातळीवर प्रयोगशाळा स्थापन करणे, इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. त्यासाठी शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी केली जात आहे. संपूर्ण राज्यात सभांचे आयोजन करण्यात आले असून बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला शेतकरी नेते विजय जावंधिया, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, विजय कुंभार, काशिनाथ जाधव इत्यादी नेत्यांनी बळ दिले आहे.
शेतकऱ्यांची एकजूट राखण्याचे आव्हान
जात, धर्म, पंथ आणि राजकीय गुलामी यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होत नाही. या स्थितीचा गैरफायदा व्यवस्था आणि सरकार घेते. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला ही परिस्थिती जबाबदार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येत नाहीत, असे विरोधक म्हणत असतील, तरी आम्ही शेतकऱ्यांना एकत्र आणू आणि संघटित शक्ती सरकारला दाखवून देऊ, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी गेल्या जून महिन्यात गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे, असा आरोप करून बच्चू कडू यांनी नंतर देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झालेल्या चिलगव्हाणपर्यंत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.
बच्चू कडू यांनी प्रहार संघटना स्थापन करून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न हाती घेतले. अभिनव पद्धतीने आंदोलने करून सरकारला मागण्यांची दखल घेण्यास त्यांनी भाग पाडले. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महायुतीत असूनही विरोधी राजकारण केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. आता शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी पुन्हा महायुती सरकारला आव्हान दिले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले आहेत. आता त्यांच्या आंदोलनात्मक भूमिकेविषयी सरकार काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे.