‘भारत जोडो’ यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचली असून सध्या विश्रांती घेण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी काश्मीर गेट येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत मित्र पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील विरोधी प्रमुख विरोधी पक्षांनी या यात्रेपासून लांब राहण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे मात्र यात्रेत सहभागी होणार आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेत मित्र पक्षांना सहभागी होण्याचे काँग्रेसचे हे निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतील नुकसानीच्या संभाव्य भीतीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याशिवाय, समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातील सहकारी राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हेदेखील यात्रेत सहभागी होण्याची शक्यता नाही. तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही यात्रेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘सप’ने काँग्रेसशी युती केली होती. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. अखिलेश यात्रेत सहभागी झाले तर २०२४ च्या लोकसभेत काँग्रेसशी आघाडी होत असल्याचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. २०१९ मधील चूक आगामी लोकसभा निवडणुकीत टाळण्याचा प्रयत्न अखिलेश यादव करीत आहेत, असे मानले जाते.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरला पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन, सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली. उपराज्यपालांकडून यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले आहे.काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि सीपीएम नेते एमवाय तारिगामी हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मीरमध्ये या यात्रेत केंद्र सरकारच्या अन्य विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याबाबत निमंत्रण देण्यात आले असुन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती, सीपीएम नेते एमवाय तारिगामीही यात्रेत सहभागी होणार आहेत.