Bihar election 2025 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, मात्र बिहारच्या राजकारणातील तीन नेत्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतील त्यांची कामगिरी त्यांच्या पक्षांचे भवितव्य ठरवेल आणि बिहारच्या राजकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाईल असे, बोलले जात आहे. हे नेते म्हणजे नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर.

नितीश कुमार यांची भूमिका काय असेल?

जनता दल (युनायटेड) (जेडीयू) चे नेते नितीश कुमार गेली दोन दशके बिहारचे मुख्यमंत्री आहेत. एकेकाळी ‘सुशासन बाबू’ म्हणून विकासकामांसाठी त्यांची प्रशंसा होत असे, पण गेल्या काही वर्षांत ते त्यांच्या प्रशासकीय कामांपेक्षा त्यांच्या राजकीय निर्णयांसाठी जास्त चर्चेत राहिले आहेत. नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यामुळे, जर जेडीयू-भाजपा युतीने निवडणूक जिंकली तर ते मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकतील का, अशी शंका अनेकजण उपस्थित करत आहेत. भाजपाने आतापर्यंत दुसरा पर्याय समोर न ठेवल्यामुळे, नितीश कुमारच युतीचे नेतृत्व करत आहेत. प्रश्न असा आहे की, या निवडणुकीनंतर नितीश कुमार १० व्या वेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील की नाही?

तेजस्वी यादवांसमोरील आव्हान

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव या निवडणुकीत एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. २०२० च्या निवडणुकीत, आरजेडीने लढवलेल्या १४४ जागांपैकी ७५ जागा जिंकल्या होत्या आणि ते विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आले होते. मात्र, आरजेडीचा सहयोगी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे त्यांना सरकार स्थापन करता आले नाही.

मागील निवडणुकीनंतर, लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे तेजस्वी यादव यांनी एकट्याने पक्षाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी बघता तेजस्वी यादव यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ते राहुल गांधींच्या ‘मतदार अधिकार यात्रे’मध्येदेखील सहभागी झाले आहेत. त्यासह तेजस्वी यादव यांनी स्वतःची ‘बिहार अधिकार यात्रा’ काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तेजस्वी यादव भाजपाच्या प्रभावी निवडणूक यंत्रणेच्या विरोधात आहेत.

प्रशांत किशोर यांच्या राजकारणातील एंट्रीचा परिणाम

निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी असा प्रवास केलेले प्रशांत किशोर आता इतर पक्षांसाठी योजना तयार करण्याऐवजी स्वतः एका पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी स्थापन केलेला ‘जन सुराज पार्टी’ हा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. २०२२ मध्ये संपूर्ण राज्यात यात्रा काढणाऱ्या प्रशांत किशोर यांचा दावा आहे की, त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेचे सहकार्य लाभले आहे आणि ते निवडणुकीच्या निकालात दिसेल. मात्र, मुख्य प्रवाहातील पक्षांच्या नेत्यांनी ‘जन सुराज’ ला महत्त्व देणे टाळले आहे आणि ‘जन सुराज’ पक्षाची कामगिरी निराशाजनक राहील असे भाकीत केले आहे.

काहींनी प्रशांत किशोर यांची तुलना अरविंद केजरीवाल यांच्याशी केली आहे आणि बिहारच्या राजकारण्यांवर केलेले त्यांचे आरोप हे राजकारणात आपले स्थान मिळवण्याचा एक प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ‘जन सुराज’ने सोशल मीडियावरील प्रचाराने लक्ष वेधून घेतले आहे आणि निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर हे चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रशांत किशोर यांनी केलेले दावे कितपत खरे ठरतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

निवडणुकीआधीच्या सर्व्हेत जनतेचा कल कुणाकडे?

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, पुढील निवडणुकीत जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वोच्च पसंती नाहीत. नितीश कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. राजकीय विश्लेषक आणि काही वर्षांपूर्वी राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांना दुसऱ्या क्रमाकांची पसंती देण्यात आली आहे.

प्रशांत किशोर यांनी बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव आहे. बिहारमधील लोजप (रामविलास) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री, एनडीएतील भागीदार चिराग पासवान यांना पाचव्या क्रमाकांची पसंती मिळाली आहे.