बीड : स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली. यात एकमेकांवर टीका करणाऱ्या पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांची मोट एकत्र बांधण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे प्रमूख म्हणून सुरेश धस आणि प्रभारी म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या नेत्यांनी बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवून टाकण्याची जबाबादारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतल्या घटकपक्षात युती बाबतचे चित्र अद्यापि अस्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपने बीड मधील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचा संदेश विरोधकांनाही दिला आहे. त्याच वेळी मुंडे – धस यांचा संघर्षही शमविण्याचे काम पक्षाकडून केले जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण प्रमूख ?
निवडणूक प्रमूख आणि निवडणूक प्रभारींच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणी लक्ष घालायचे, याचे संकेतही भाजपने घालून दिले आहेत. त्यामुळे काही मोठ्या नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. डॉ. भागवत कराड यांना छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या राजकारणात अधिक रस आहे. पण त्यांच्याकडे आता जालना जिल्ह्याचे प्रभारी पद देण्यात आले आहे. कैलास गोरंट्याल हे त्यांचे निवडणूक प्रमूख असणार आहेत. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सर्व निर्णय मंत्री अतुल सावे हेच घेतील, असे स्पष्ट झाले आहे. तेच या जिल्ह्याचे प्रभारी असून छत्रपती संभाजीनगरचे निवडणूक प्रमूख म्हणून समीर राजूरकर, अनुराधा चव्हाण आणि सुरेश बनकर यांना नियुक्त करण्यात आले आहे.
लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर
लातूरमधील नगरपालिकेबाबतचे निर्णय संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारुनच घेतले जाणार आहेत. मात्र, अर्चना पाटील चाकुरकर यांना निवडणूक प्रमूख करण्यात आले आहे. परभणी शहर आणि ग्रामीण जिल्ह्यात रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपुडकर यांना निवडणूक प्रमूख तर प्रभारी पदी मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिवचा कारभार राणा जगजीतसिंह पाटील यांच्याकडे देण्यात आला असून सुजितसिंह ठाकूर यांच्याकडे निवडणूक प्रमूख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आजारपणातून उठल्यानंतर गेल्या काही दिवसापासून ठाकूर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
नांदेडचा किल्ला अशोकरावांच्या हाती
सर्वाधिक नगरपालिकांच्या निवडणुका असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण प्रभारी असतील तर आमदार श्रीजया चव्हाण, राजेश पवार यांच्या बरोबर खासदार डॉ. अजित गोपछेडे यांची निवडणूक प्रमूख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडच्या हद्दीपर्यंत उमेदवारीबाबतचे सर्व निर्णय अशोक चव्हाण हेच घेतील, हे नव्या नियुक्तीमुळे समोर आले आहे.
