मुंबई : पक्षश्रेष्ठींचा विद्यमान अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांच्यावर अधिक विश्वास असल्याने महापालिका निवडणूक पार पडेपर्यंत मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडेच कायम ठेवावीत, असा पक्षाचा कल आहे. पण शेलार यांना तिसऱ्यांदा दिलेल्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही चौथ्यांदा त्यांच्याकडे जबाबदारी देणे, पक्षाच्या शिस्तीला धरून होणार नाही. त्यामुळे निवडणूक काळात या पदावर कोणाची नियुक्ती करायची, याबाबत भाजपमध्ये तिढा आहे.

शेलार हे गेली अनेक वर्षे मुंबई अध्यक्षपद भूषवीत असून पक्षाच्या नियमानुसार दोन वेळा त्यापदी नेमता येत होते. पण नियमात बदल करून तिसऱ्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंकडून काढून घ्यायची आणि भाजपचा महापौर निवडून आणायचा, असा भाजपने चंग बांधला आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे तिसऱ्यांदा शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक लांबणीवर गेली. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

भाजपमध्ये मात्र अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून राज्यातील सर्व तालुका, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यानंतरही मुंबई अध्यक्षपदासाठी कोणाचीही निवड अद्याप करण्यात आलेली नाही. या पदासाठी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम, योगेश सागर, प्रसाद लाड या नेत्यांच्या नावांची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. पण निवडणूक जिंकण्यासाठी नेतृत्वाची धुरा कोणाकडे द्यायची, हा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेलार यांनी निवडणूक तयारीच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

शेलार यांनी २८ जून रोजी निवडणूक संचालन समितीची घोषणा करून मुंबईतील वरिष्ठ नेत्यांकडे लोकसभा मतदारसंघ निहाय कामाच्या जबाबदाऱ्याही सोपविल्या आहेत. निवडणूक काळात संघटनाबांधणी, जबाबदाऱ्यांचे वाटप, तालुका-जिल्हास्तरापर्यंत पदाधिकाऱ्यांना कामाला लावणे, आदी बाबींमध्ये शेलार यांनी बारकाईने लक्ष घातले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत त्यांनीच धुरा सांभाळावी व पक्षाला मोठा विजय मिळवून द्यावा, असे वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही वाटत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला शेलार हेच समर्थपणे तोंड देतील, असे त्यांचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण शेलार यांच्याकडे मंत्रीपद आहे. त्याचबरोबर तिसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर ते चौथ्यांदा पुन्हा दिल्यास पक्षात अन्य कोणी चांगले नेते नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होवू शकतो. शेलार यांनीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती तातडीने करावी, अशी विनंती अनेकदा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची,याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू आहे. शेलार यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी मात्र कायम ठेवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.