छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ पैकी २०१९ मध्ये निवडून आलेल्या १६ मतदारसंघातील उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये जाहीर केली. श्रीजया अशोक चव्हाण आणि अनुराधा चव्हाण या दोन नव्या महिला उमेदवारांसह २०१९ मध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांना भाजप निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे.

फुलंब्री मतदारसंघातून निवडून येणारे हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने त्यांच्या मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदस्थ अधिकारी आहेत. अलिकडेच हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळयाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी प्रास्ताविक भाषण केले होते. याच कार्यक्रमात बागडे यांच्या कार्यकतृत्वाच्या लघूचित्रफितीची निर्मिती अनुराधा चव्हाण यांनी केल्याचे आवर्जून स्पष्ट करण्यात आले होते.

आणखी वाचा-भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने विद्यमान आमदाराच्या गोटात अस्वस्थता?

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यसभेत खासदार झालेले अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी भोकर मतदारसंघात संपर्क वाढविला होता. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत होते. मराठवाड्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या अन्य सर्व आमदारांना भाजपने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले असून यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. उमेदवारी देण्यात तिसऱ्या महिला उमेदवार नमिता मुंदडा या केज मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आल्या होत्या. जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठवाड्यात २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे १६ आमदार निवडून आले होते. तत्पूर्वी २०१४ मध्ये भाजपचे मराठवाड्यात १५ आमदार होते. त्यामुळे या वेळी भाजपचे प्रभाव क्षेत्र वाढते की नाही, याची उत्सुकता आहे. मराठवाड्यातून उमेदवारी देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मंत्री अतुल सावे यांचे नाव आहे. सावे हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, बबन लोणीकर, नारायण कुचे यांना उमेदवारी देण्यात आली असून हे तिघांनीही दोन व तीन वेळा विधानसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा-अमरावती जिल्‍ह्यात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्‍हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाराशिवमधील भाजपच्या वाट्याला आलेल्या एकमेव तुळजापूर मतदारसंघात राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर , औसा मतदारसंघातू अभिमन्यू पवार यांची उमेदवार म्हणून नावे जाहीर जाहीर झाली आहेत. लातूर शहरमधून उमेदवारीसाठी इच्छूक असणाऱ्या अर्चना पाटील चाकुरकर यांचे नाव पहिल्या यादीत समाविष्ट नाही. लाडकी बहीण योजनेवर भाजप प्रचाराचा जोर असल्याने महिला उमेदवारांना किती स्थान दिले जाईल याची उत्सुकता होती. मराठवाड्यातून जाहीर करण्यात आलेल्या १६ मतदारसंघामध्ये चार महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.