Bihar election 2025 बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आहेत.

प्रशांत किशोर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या आरोपांनी, एनडीए सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. याच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल बोलले आहेत. पीयूष गोयल कतार दौऱ्यावर असतानाच त्यांनी ‘टीव्ही ९ भारतवर्ष’शी संवाद साधला आहे. यावेळी ते बिहार राजकारण आणि त्यासह त्यांच्या कतार दौऱ्याच्या महत्त्वाविषयी बोलले आहेत. पीयूष गोयल नक्की काय म्हणाले? बिहारमधील राजकीय चित्र कसे आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…

काय म्हणाले पीयूष गोयल?

  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बिहार निवडणूक २०२५ आणि प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडले आहेत.
  • प्रशांत किशोर यांनी एनडीए सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल त्यांना विचारले असता पीयूष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या निवडणुकीत प्रशांत किशोर कोणताही महत्त्वाचा फॅक्टर नाहीत. प्रशांत किशोर यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव कमी आहे.”
  • ते पुढे म्हणाले, “बिहारची जनता खूप हुशार आहे. लोकांना चांगले माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बिहार निवडणूक २०२५ आणि प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तसेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने बिहारसाठी काम केले आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारच्या डबल इंजिन सरकारच्या कामांची नोंद घेतली आहे,” असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. पीयूष गोयल यांना किती जागांवर एनडीएचा विजय होईल असे विचारले असता त्यांनी दावा केला की, एनडीए सरकार बिहारमध्ये मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल.

कतार दौऱ्यातून देशाला काय मिळाले?

कतार दौऱ्यादरम्यान टीव्ही ९ भारतवर्षशी झालेल्या या विशेष मुलाखतीत त्यांना कतार दौऱ्याविषयीदेखील विचारण्यात आले. या दौऱ्यातून देशाला काय फायदा झाला हेही त्यांनी सांगितले. पीयूष गोयल म्हणाले, “मी सर्वप्रथम माननीय पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण आज त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या २५ व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांनी जनसेवेचे ऐतिहासिक कार्य केले आहे. १४० कोटी देशवासी त्यांचे ऋणी आहेत. २०२५ हे वर्ष भारत आणि कतार यांच्यातील व्यापारी संबंधांसाठी मैलाचा दगड ठरेल.”

पीयूष गोयल यांनी सांगितले की, कतारबरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. वस्तू आणि सेवांमधील व्यापार वाढवण्यावर तसेच भारतातून निर्यात वाढवण्यावर चर्चा झाली. “कतारकडून ९० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरात लवकर यावी यासाठी आम्ही कतार सरकारच्या विविध विभागांशी चर्चा केली आहे,” असे ते म्हणाले.

कोणत्या देशांबरोबर ‘मुक्त व्यापार करारा’वर चर्चा सुरू?

या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भात (एफटीए) चर्चा सुरू आहेत. न्यूझीलंड, युरोपियन युनियन, पेरू, चिली, अमेरिका यांच्यासह अन्य काही देशांबरोबर मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, भारत वेगाने विकसित देशांबरोबरचे आपले संबंध वाढवत आणि सुधारत आहे. कतारबरोबर पुढील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एफटीए पूर्ण होण्याची आशा आहे. अमेरिकेबरोबरच्या एफटीएवरील चर्चेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “अमेरिकेबरोबरही चर्चा सुरू आहे. लवकरच दोन्ही देशांचे व्यापारी, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपून गोष्टी निश्चित केल्या जातील.”

चीनसोबत सध्या कोणतीही चर्चा नाही

पीयूष गोयल यांनी चीनबरोबरचे व्यावसायिक संबंध पुढे नेण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले की, “सध्या चीनबरोबर व्यावसायिक संबंधांवर कोणतीही चर्चा झालेली नाहीये.” मात्र, “आज जगात इतकी अस्थिरता असतानाही, भारताची निर्यात चार ते पाच टक्क्यांनी वाढली आहे. पहिले सहा महिने खूप चांगले गेले आहेत. एवढी चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व निर्यातकांचे मी आभार मानतो.”

बिहारमधील चित्र काय?

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, पुढील निवडणुकीत जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वोच्च पसंती नाहीत. नितीश कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. राजकीय विश्लेषक आणि काही वर्षांपूर्वी राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांना दुसऱ्या क्रमाकांची पसंती देण्यात आली आहे.

प्रशांत किशोर यांनी बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार हे तिसऱ्या स्थानावर आहेत, तर चौथ्या स्थानावर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव आहे. बिहारमधील लोजप (रामविलास) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री, एनडीएतील भागीदार चिराग पासवान यांना पाचव्या क्रमाकांची पसंती मिळाली आहे.