शैक्षणिक संस्थांवर वर्चस्व असणारी बहुतांश कॉग्रेस आणि राष्ट्रवादीतील मंडळी नव्याने ‘भाजप’मधून सत्ताधारी बनलेली असल्याने पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक असल्याचे चित्र आहे. या वेळी पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीसाठी प्रवीण घुगे किंवा किशोर शितोळे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी या मतदारसंघातील नोंदणी प्रमूख पदाची जबाबदारी संजय केनेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उमेदवार कोण असू शकतो याची चाचपणी केली जाईल असे सांगण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील एका बैठकीस अशोक चव्हाण यांनी बारकाईने नियोजन केले आहे. पदवीधर मतदारसंघात नोंदणीसाठी अर्ज छपाई करुन घेऊन ते अर्ज भरण्यासाठी यंत्रणा लावणारे कार्यकर्ते कोणाकडे असू शकतात, याचा विचार केला जात आहे.

राष्ट्रवादी काॅग्रेसचे सतीश चव्हाण यांच्याकडे अशी यंत्रणा आहे, हे भाजप नेत्यांना ठावूक आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात संपर्क असणाऱ्या व्यक्तीला या मतदारसंघाची जबाबदारी द्यावी व त्यातून मतदारसंघ बांधावा, अशी रचना भाजपकडून केली जात आहे. तुर्तास फक्त मतदार नोंदणीवर लक्ष देऊन ती संख्या वाढविण्यावर भर देणार असल्याचे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सांगत आहेत. या पूर्वी या मतदारसंघात प्रवीण घुगे यांनी मतदारसंघ नोंदणी प्रमुख म्हणून काम केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हेही उमेदवार असू शकतात. देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करणारे किशोर शितोळे हे बँकांच्या माध्यमातून मतदारसंघ बांधू शकतात असा दावा केला जातो. व्यक्तिगत बांधणीपेक्षाही पक्ष म्हणून हा मतदारसंघ बांधू आणि निवडणुका लढवू अशी रणनीती ठरवून आम्ही काम करत असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे सतीश चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि लातूर व धाराशिवमधील व्यक्तिगत संपर्कावर यंत्रणा उभी करण्याची तयारी करत आहेत.

गंगापूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मराठवाडाभर संपर्क सुरू केला आहे. जालन्यातील राजेश टोपे वगळता अजित पवार गटातून वजा झालेले नेते कमी आहेत. त्यामुळे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थामधून नोंदणीच्या कार्यक्रमास सुरूवात झाली आहे. बैठकांमधून नियोजन सुरू झाले आहे.

पदवीधर मतदासंघाची निवडणूक भाजप गांभीर्याने घेत असल्याने राष्ट्रवादी काॅग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणही पुन्हा बांधणीच्या कामाला लागले आहेत. या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चित्र असल्याने महायुतीमधील ‘ मैत्री’ पूर्ण लढत ‘ महायुती’ च्या संबंधावर परिणाम करेल का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.