पुणे : पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. या पदासाठी तीन नावे चर्चेत असल्याने हे त्रांगडे कसे सोडवायचे, या विवंचनेत पुणे जिल्ह्यातील काँग्रेस असतानाच जगताप यांनी पक्ष सोडताना ‘माझ्या काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवले आहे’ असे वक्तव्य केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये ‘संशयकल्ल्लोळा’चे वातावरण पसरले आहे.

जगताप यांनी त्यांच्या कार्यकारिणीत अनेक जवळच्या साथीदारांना संधी दिली असल्याने जगतापांचे निष्ठावंत कोण आणि त्यांना पक्षात ठेवायचे की त्यांची हकालपट्टी करायची, अशा संभ्रमात काँग्रेस पडली आहे.

माजी आमदार जगताप यांनी गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे जाहीर सभा घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. जगताप हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकारिणीत त्यांनी जवळच्या सहकाऱ्यांची वर्णी लावली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या विद्यमान कार्यकारिणीत जगताप यांच्या निष्ठावंतांची संख्या जास्त आहे.

जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना ‘माझ्या काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवले आहे. ते योग्य वेळी भाजपमध्ये येतील.’ असे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे जगताप यांचे विश्वासू साथीदार कोण, याचा शोध घेण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. त्यावरून पदाधिकारी हे एकमेकांकडे संशयाने पहात असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये ‘संशयकल्लोळ’ निर्माण झाल्याचे दिसून येते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेस भवन येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जगताप यांच्या निष्ठावंतांना पक्षातून काढून टाकावे आणि जगताप यांची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, जगताप यांचे सध्याचे निष्ठावंत कोण, हे शोधण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.

जगताप आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात पक्ष कमकूवत झाला असताना आणखी काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगतापांच्या निष्ठावंतांना काढायचे की ठेवायचे, असा प्रश्न काँग्रेसपुढे पडला आहे.

जिल्हाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत

संजय जगताप हे भाजपमध्ये गेल्याने नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये श्रीरंग चव्हाण, लहु निवंगुणे आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम मोहोळ यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात आले. चव्हाण यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवंगुणे हे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. संग्राम मोहोळ यांना राजकीय वारसा आहे. या तिन्ही इच्छुकांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मुळशी आणि खडकवासला परिसर आहे. त्यातून कोणाची निवड करायची, याबाबत त्रांगडे निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेल्या इच्छुकाची निवड करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.