मुंबई : देशाचे पंतप्रधान ‘एक है, तो सेफ है’ च्या घोषणा देत असतील तर ते देशाचे दुर्दैव आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे, असे सांगत आहेत. भाजपचे नेते महाराष्ट्रातील मतदारांना भीती दाखवत आहेत. निवडणूक काळात भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गेहलोत बोलत होते. या वेळी पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रवक्ते सचिन सांवत, अतुल लोंढे आदी उपस्थित होते. गेहलोत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात भीतीदायक वातावरण निर्माण करीत आहेत. मतदारांना भीती दाखत आहेत. वृत्तपत्रांमधून जाहिराती दिल्या जात आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणा देणे हे देशाचे दुर्दैव आहे. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. एका राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या घोषणा कशा देऊ शकतात. निवडणूक काळात अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई का केली जात नाही. निवडणूक आयोग कुणाच्या सल्ल्याने काम करतोय? महाराष्ट्र पुरोगामी आहे. देशाच्या विकासाला दिशा देणारे राज्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण करून, मतदारांना भीती दाखवून मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

हेही वाचा >>> राज्यात आतापर्यंत ४९४ कोटींची संपत्ती जप्त; मुंबई उपनगरात सर्वाधिक मालमत्ता जप्त

भाजपने राज्यघटनेची पायमल्ली करून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे पाडली. राजस्थानमध्येही असाच प्रयोग झाला पण, आम्ही भाजपचा प्रयत्न हाणून पाडला. गरिबांसाठीच्या योजना कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेशात सुरू आहे. निवडणूक महाराष्ट्राची आणि टिका काँग्रेसशासित राज्यांवर, असा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी, शेतीच्या दुरवस्थेबाबत भाजप बोलत नाही, असे गेहलोत म्हणाले.

भाजपने सोमवारी वृत्तपत्रांमधून ‘एक है, तो सेफ है’ च्या जाहिराती दिल्या आहेत. भाजपने नेमके कोण कुणाला काटणार आहे, हे जाहीरपणे सांगावे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा प्रचार चालणार नाही. समाजात, जाती- धर्मांत फूट पडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. आम्हाला विकास, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे. – वर्षा गायकवड, खासदार, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सोडविणार’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा उठविण्याची घोषणा केली आहे. आम्ही जातीनिहाय जणगणना करून, कुटुंबनिहाय सामाजिक, आर्थिक स्थितीची माहिती संकलित करणार आहोत. जो समाज मागास राहिला आहे, त्याला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटविण्याची आमची भूमिका आहे. समाजातील सर्वच मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे गेहलोत म्हणाले.