Rahul Gandhi says Assam CM will go to jail : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं. मात्र, त्यानंतरच्या हरियाणा, महाराष्ट्र व दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाने जोरदार पुनरागमन करीत विरोधकांना चितपट केलं. आता आगामी काळात बिहारसह पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यासाठी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. २०२६ मध्ये आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना तुरुंगात टाकणार, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (तारीख १५ जुलै) दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील त्यांना तुरुंगवारीपासून वाचवू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी स्वतःच त्यांच्याविरोधात देशभर दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांमध्ये जामिनावर बाहेर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीति आखाली. गुवाहाटीपासून ४० अंतरावर चायगावमध्ये दोघांनी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं.
राहुल गांधींनी भाजपा सरकारवर काय आरोप केले?
आसाम सरकारकडून राज्यातील शासकीय जमिनी कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “हिमंता बिस्वा सरमा हे स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर आसामचे राजा मानतात आणि हा राजा २४ तास तुमच्या जमिनी कधी अदानींना तर कधी अंबानींना देण्यात गुंतलेला आहे; पण तुम्ही जर त्यांचा आवाज काळजीपूर्वक ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये एक भीती आहे. सरमा यांना माहीत आहे की, एक ना एक दिवस काँग्रेसचा बब्बर शेर त्यांना पकडून तुरुंगात पाठवेल. आसाममध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला एक दिवस उत्तर द्यावेच लागेल.”
आणखी वाचा : शिंदे गटाची रिपब्लिकन सेनेबरोबरची युती नेमकी कशासाठी? काय आहेत यामागची कारणं?
मल्लिकार्जुन खरगेंचाही भाजपा नेत्यांना इशारा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीकेचा भडिमार केला. काँग्रेसमधून पळून गेलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करीत खरगे म्हणाले, “आज जे लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. सध्या त्यांच्याकडे सत्ता असल्याने त्यांनी तुरुंगाची सुधारणा करून घ्यावी. कारण- काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर त्यांना तिथेच राहावे लागणार आहे. राज्यातील ज्या लोकांची घरे भाजपा सरकारने अतिक्रमणाच्या नावाखाली पाडली आहेत ती घरे काँग्रेस पुन्हा बांधून देईल.”
धुबरीतील जमिनीवरून वाद का निर्माण झाला?
- धुबरी जिल्ह्यातील एका प्रस्तावित प्रकल्पासाठी भाजपा सरकारने संबधित कंपनीला सरकारी जमीन दिली.
- या जमिनीवर जवळपास १,४०० हून अधिक कुटुंबांनी बांधलेली घरे सरकारकडून पाडण्यात आली.
- बेदखल झालेल्या बहुतांश कुटुंबांमध्ये गरीब, मजूर, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाचे लोक आहेत.
- सरकारच्या म्हणण्यानुसार, ही जमीन सरकारी, जंगल, चारागृह किंवा धार्मिक संस्थांची आहे.
- लोकांनी अतिक्रमण करून त्यावर घरे बांधल्याने ही कारवाई करण्यात आली, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय.
- भाजपा सरकारच्या कारवाईवर काँग्रेससह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त केला.
- सरकारी जमिनी उद्योग समूहांना देऊन गरिबांना हाकलून लावलं जातंय, असा आरोप काँग्रेसने केला.
- हा प्रकल्प अदानी समुहाचा असून सरकार उद्योगपतीच्या फायद्यासाठी गरिबांना तिथून बेदखल करतंय, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
- दुसरीकडे, भाजपा सरकारने सर्व आरोप फेटाळून लावत विरोधक अपप्रचार करीत असल्याचं म्हटलं आहे.

मोदी, शाहाही वाचवू शकणार नाहीत : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, “आसाममध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास मुख्यमंत्री सरमा यांना थेट तुरुंगात पाठवलं जाईल. पंतप्रधान मोदी व अमित शाह हेदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत. सरमा हे भ्रष्ट व्यक्ती असून ते २४ तास गरिबांच्या जमिनी लुटतात; पण आता तरुण, शेतकरी, कामगार आणि आसामच्या सर्व समाजातील लोक मिळून त्याला तुरुंगात पाठवतील.” यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्रातील मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला. बिहारमध्येही निवडणूक आयोगाकडून मोहीम राबवीत अनेकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आसाममधील जनतेने सावधगिरी बाळगून सजग राहायला हवे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री बिस्वा म्हणाले, राहुल गांधी स्वत:च जामिनावर
दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राहुल गांधी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर सरमा यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदाराला टोलाही लगावला. राहुल गांधी स्वतःच त्यांच्याविरोधात देशभर दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांमध्ये जामिनावर बाहेर आहेत, हे ते सोईस्करपणे विसरले आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकू असं सांगण्यासाठी ते इथपर्यंत आले आहेत, असं मुख्यमंत्री बिस्वा यांनी म्हटलं आहे.