चंद्रशेखर बोबडे

नागपूर : नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या गोंधळाला महिना उलटला तरी त्याची पक्षांतर्गत चर्चा मात्र अजून सुरूच आहे. वरिष्ठांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्यावरही ते गप्प का? असा सवाल एका गटाकडून तर गोंधळ घडवून आणण्यामागचा सूत्रधार कोण? असा सवाल दुसऱ्या गटाकडून केला जात आहे. मात्र असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून या विरोधात एकही स्थानिक वरिष्ठ नेता उघडपणे बोलायला तयार नाही. आमदार विकास ठाकरे यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष असणे हे जरी यामागे कारण असले तरी ठाकरे विरोधीगटातील प्रमुख नेत्यांना आगामी निवडणुकीत त्यांच्या मुलांना पक्षाची उमेदवारी हवी आहे आणि त्यामुळेच ते प्रदेशाध्यक्षांशी थेट संघर्ष घेऊ इच्छित नाही, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेसच्या आढावा बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे व पक्षाचे प्रदेश पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांच्यातील जाहीर वादाची चर्चा संपली नाही. पक्षाच्या शिस्तपालन समितीने या प्रकरणात जिचकार यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई सुरू केली. पण पक्षाच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी या घटनेबाबत अद्याप मौन बाळगले आहे.

हेही वाचा… मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप करण्यास केंद्राचा नकार ?

हेही वाचा… राष्ट्रवादीतील फुटीनंतरही मोदींना घ्यावी लागली शरद पवारांची दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात काँग्रेसमध्ये माजी खासदार व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार आणि त्यांचे पारंपारिक विरोधक नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी व अन्य नेते असे दोन गट आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २०१९ ला नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढल्याने ते स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नागपूरमध्ये निवासस्थान असल्याने येथूनच ते राजकारणाची सूत्रे हलवतात. ठाकरे-जिचकार वादात पटोले यांनी “शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई करू” अशी प्रतिक्रिया दिली. पण पक्षाने जिचकार यांना नोटीस पाठवल्याने पटोलेंचा कल कोणाच्या बाजूने आहे हे यातून स्पष्ट झाले. ठाकरे विरोधक या मुद्यावरून पटोलेंवर निशाणा साधतील अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा सध्या जोरात आहेत. ठाकरे विरोधक प्रमुख नेते सध्या वेगळ्या विवंचनेतआहे. वरवर हा ठाकरे विरोधातील संघर्ष असला तरी या नेत्यांचा विरोध हा पटोले यांना आहे. त्यामुळे ठाकरेंचा विरोध म्हणजे पटोलेंचा विरोध असा त्याचा थेट अर्थ निघतो. म्हणून ठाकरे विरोधकांनी त्यांच्या तलवारी म्यान केल्याचे सध्याचे चित्र आहे. कारण नितीन राऊत यांचे पुत्र व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत सध्या शिवसेनेत असले तरी ते महाविकास आघाडीकडून (सेना किंवा काँग्रेस) पूर्व नागपूरमधून निवडणूक लढवू शकतात. वडेट्टीवार हे सुद्धा मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. यात प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची भूमिका निर्णायक असल्याने नागपूरच्या वादावर या नेत्यांनी जाहीर बोलणे टाळलेले दिसते. असे असले तरी ही वादळापूर्वीची शांतता ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.