नाशिक – लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चार, पाच लहान पक्षांसह मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश अवघड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषत: मुंबईसह अन्य प्रमुख महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढत असताना, काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटक नसणाऱ्या पक्षाशी युती न करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता असली तरी महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष यांच्या साथीने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मत विभागणी टाळण्यास आघाडीला यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट सहन करावी लागली. बहुसंख्य जागांवर पराभव झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मुंबईसह इतर महापालिकांमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) मनसेच्या साथीने नवे समीकरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यस्तरावर आघाडी करणार नाही. या निवडणुकीत युती, आघाडीचे अधिकार पक्षाने स्थानिक पातळीवर बहाल केले. मात्र ते देताना इंडिया आघाडीतील घटक पक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाशी युती न करण्याची अट घातली आहे. मनसे युतीचा भाग नसल्याने त्यांच्याशी युती करणे काँग्रेसला मान्य नाही. खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसला नव्या भिडूची गरज नाही, असे ठामपणे सांगितले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मनसेला महाविकास आघाडीत स्थान मिळणे कठीण आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) मनसेशी हातमिळवणीला उत्सुक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट धोक्यात येण्याची शक्यता आहे. मनसेला आघाडीत जाण्यात कितपत रुची आहे, हा देखील प्रश्न आहे. आगामी निवडणुकीत ठाकरे गट-मनसेचे एकत्र येणे महाविकास आघाडीत बिघाडीला कारक ठरण्याची चिन्हे आहेत.