राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताच समाजमाध्यमावर ‘मी पण चालणार’ अशी हॅश टॅग प्रसारित होऊ लागली आहे. यामुळे अनेकांना यात्रेत सहभागी होण्याचा जोश निर्माण झाला आहे. मात्र, पूर्वनोंदणी न करता अशाप्रकारे ऐनवेळी यात्रेत सहभागी होणाऱ्यांना त्यांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे.

हेही वाचा… देवराव भोंगळे : अभ्यासू व्यक्तिमत्त्व

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात सोमवारी प्रवेश केला असून राज्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते ‘मी पण चालणार’ असे (हॅश टॅग) समाजमाध्यमाच्या माध्यमातून सांगत आहेत. अनेकांना यात्रेबाबत उत्सुकता आहे. या यात्रेचा विदर्भातील प्रवास १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार असून यात्रा वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना स्थानिक पातळीवर काँग्रेसकडे नावे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार नियोजन केले जात आहे. पण ज्यांनी शहर काँग्रेसकडे नावे नोंदवली नाही, पण ते यात्रेत सहभागी झाल्यास त्यांना वाहनाची आणि राहण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे.

हेही वाचा… राहुल गांधी यांनी लहानग्यांना करून दिली संगणकाची ओळख

नागपुरातून काही युवकांचे काही गट नांदेडकडे रवाना झाले आहेत. त्यांना केवळ यात्रा बघावयाची आहे. ते स्वत:च्या वाहनांनी यात्रास्थळाकडे निघाले आहेत. तर काही कार्यकर्ते वाशीमला यात्रेत सहभागी होणार आहेत. पण ज्यांना यात्रेसोबत चालायचे नाही ते शेगाव येथील जाहीर सभेत सहभागी होणार आहेत, असे काँग्रेस नेते व महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले.

हेही वाचा… कोल्हापूर-सोलापुरातील युवा नेतृत्वाचा भीमा कारखान्याच्या निवडणुकीत सामना

वेगवेगळ्या जिल्ह्यातील यात्रेचे नियोजन वेगवेगळ्या उपसमितीकडे असून त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था समितीकडे आहे. यात्रेत सहभागी प्रत्येकाची भोजन व्यवस्था करण्याची सूचना समितीला देण्यात आली आहे. परंतु राहण्याची व्यवस्था ज्यांनी नोंदणी केली त्यांचीच केली जाणार आहे. यात्रेच्या मार्गातील गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, समाज भवनात यात्रेकरूंच्या व्यवस्थेचे नियोजन आहे. त्यामुळे ऐनवेळी यात्रेसाठी जाणाऱ्यांना देखील फारशी अडचण येणार नाही, असे वरिष्ठ काँग्रेस नेते व प्रदेश सरचिटणीस प्रफुल गुडधे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress workers rushed to participate in the bharat jodo yatra by seeing the response print politics news asj
First published on: 10-11-2022 at 12:31 IST