Mahayuti minister controversy गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्याने सरकारची बदनामी होत असल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विरोधी पक्षापेक्षाही त्यांचे स्वतःचे मंत्रिमंडळ सहकारी वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणी निर्माण करत आहेत. शुक्रवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल असंवेदनशील विधान केले आहे, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे आणि महायुती सरकार अडचणीत सापडले आहे. मंत्र्याने नक्की काय विधान केले? त्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढणार का? भाजपा नेते काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊयात…

सहकार मंत्र्याचे वादग्रस्त विधान

“लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्ही राजकारणी लोकही लगेच कर्जमाफीची आश्वासने देतो, कारण आम्हालाही निवडून यायचे असते. जर गावकऱ्यांनी सांगितले की जो आम्हाला निधी आणून देईल, त्यालाच आम्ही मतदान करू, तर आमचा नेता त्याचेही आश्वासन देईल. मागणी करणाऱ्यांनी काय मागावे हे ठरवावे आणि राजकारण्यांनी काय मान्य करावे हे त्यांना माहीत असावे,” असे बाळासाहेब पाटील म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहेत. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

जेव्हा शेतकरी, विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी पुराचा सामना करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य कृषी विभागाच्या मते, एकूण १४४ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती, परंतु पूर आणि पावसामुळे खरीप पिकांचे अंदाजित ६८.९ लाख हेक्टर इतके नुकसान झाले आहे. फडणवीस यांनी नुकतंच बाधित शेतकऱ्यांसाठी ३१,६७८ कोटी रुपयांचे पूर मदत पॅकेज जाहीर केले, जे राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे पूर मदत पॅकेज आहे. या घोषणेनंतर अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची ही टिप्पणी आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल असंवेदनशील विधान केले आहे, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाले आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

टीकेची झोड उठल्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या विधानाबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. “शेतकऱ्यांचे मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि मी कर्जमाफीच्या विरोधातही नाही,” असे ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या टीकेला सामोरे जाणारे पाटील हे महायुतीचे एकमेव मंत्री नाहीत. शुक्रवारी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या टीकेचा सामना करावा लागला. त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगून ते फेटाळले. कदम यांनी शुक्रवारी आपले पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी कदम यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या टीकेचा सामना करावा लागला. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

या वर्षाच्या सुरुवातीला, राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या एक रुपयाच्या विम्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याच महिन्यात, नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना बनावटगिरी आणि दोन फ्लॅट्स बेकायदा पद्धतीने मिळवल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्यांनी नंतर या निर्णयाला आव्हान दिले, ज्यामुळे त्यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळाली. त्यानंतरच्या महिन्यात, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या जवळचे सहकारी वाल्मीक कराड यांच्यावर सरपंच हत्येमध्ये सामील असल्याचा आरोप झाल्यानंतर पायउतार होण्यास भाग पाडले गेले.

जुलैमध्ये शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ रोख रकमेची बॅग असलेला एक कथित व्हिडीओ समोर आला, ज्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यालाही छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेल विक्रीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर रामदास कदम यांच्यावर अवैध वाळू व्यापार आणि त्यांच्या आईच्या नावावर डान्स बार चालवल्याचा आरोप करण्यात आला.

जुलैमध्ये शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ रोख रकमेची बॅग असलेला एक कथित व्हिडीओ समोर आला, ज्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

तसेच संजय राठोड आणि दादाजी भुसे (दोघेही शिवसेनेचे) यांसारख्या मंत्र्यांवर त्यांच्या मागणीनुसार भरती प्रक्रिया आणि बदल्यांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला. कोकाटे यांच्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या फोनवर ऑनलाइन गेम खेळताना दिसल्याने पुन्हा एकदा टीका झाली. विरोधी पक्षाचा दबाव असल्यामुळे त्यांचे केवळ खाते (पोर्टफोलिओ) बदलण्यात आले, त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले नाही.

भाजपा नेत्यांची भूमिका

सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची कानउघाडणीही केली होती. एका मंत्र्याने सांगितले, “मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जागरूक राहण्यास आणि वाद निर्माण न करता विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यांनी आरोप झाल्यास तातडीने स्पष्टीकरण देण्यासही सांगितले.” मात्र, असे असले तरी फडणवीसांच्या शब्दांचा काही परिणाम झाला असे दिसत नाही. या मंत्र्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांची दखल राज्य भाजपा नेतृत्वानेदेखील घेतली आहे.

सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची कानउघाडणी केली. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

एका भाजपा नेत्याने सांगितले की, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री वारंवार वादात अडकणे हे महायुतीसाठी चांगले संकेत नाही. “राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इतका मोठा निर्णय घेतला आहे आणि ही रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अशा मोठ्या मदत पॅकेजमुळे सरकारबद्दल चांगली भावना निर्माण झाली होती, पण जेव्हा एखादा मंत्री असंवेदनशील विधान करतो, तेव्हा गोष्टी बिघडतात,” असे एका वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या भाजपा नेत्याने निदर्शनास आणले की, जेव्हा मंत्री आणि पक्षाचे नेते नितीश राणे यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस आणि या जानेवारीत जातीयदृष्ट्या असंवेदनशील विधान केले होते, तेव्हा पक्ष नेतृत्वाने त्यांना फटकारले होते. भाजपा आपल्या मित्रपक्षांना त्यांच्या अशा नेत्यांवर आणि मंत्र्यांवर लगाम घालण्यासाठी जोर देत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विधानामुळे हे नेते वारंवार सत्ताधारी आघाडीला अडचणीत आणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकरीविरोधी वक्तव्ये सहज घेणारे नाहीत आणि ते बाबासाहेब पाटील यांच्याशी नक्कीच बोलतील.