कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत कधी सुरू करायचा यावरून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा प्रादेशिक वाद निर्माण होताना दिसत आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा जलमय झाला असल्याने तेथील कारखाने लवकर सुरू होण्याची शक्यता नाही.

विस्मा (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) या खाजगी साखर कारखानादारांच्या संघटनेने १५ ऑक्टोंबर पासून कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. तर, कर्नाटकात ऊस जात असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील बहुराज्य साखर कारखान्याचे नेतृत्व १ नोव्हेंबर पासून कारखाने सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मुद्द्यावरून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र नेत्यांमध्ये कारखाने सुरू होण्यावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने हंगाम नेमका कधी सुरू होणार यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

यावर्षी सलग चार महिने पावसाने पाठ धरली आहे. मे पासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबर संपत आला तरी अजूनही कायम आहे. गेल्या आठवड्याभरात मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे तेथील सर्व प्रकारच्या पिकांना फटका बसला आहे. त्यापूर्वीच विस्मा या संघटनेने १५ ऑक्टोंबर गळीत हंगाम पासून सुरू व्हावेत अशी मागणी केली होती. या संघटनेचे नेतृत्व मराठवाड्यातील नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे हे करीत असतात.

मराठवाड्याला महापूराचा जबर फटका बसला आहे. शिवारामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. पाणी निघून जाऊन ओल सुकेपर्यंत ऊस तोडणी करता येणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील कारखाने लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. तेथील कारखाने १५ ऑक्टोंबर पूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुराज्य साखर कारखान्यांना कर्नाटक राज्यात सुरू होणाऱ्या हंगामाची भीती आहे. तेथे जर अगोदर कारखाने सुरू झाले तर तेथे महाराष्ट्रातील हक्काचा ऊस जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कारखान्यांना आपल्याच राज्यातील ऊस गमावावा लागण्याची वेळ धोरण निश्चिती अभावी येत असते. गेल्या हंगामात २५ ते ३० लाख टन ऊस कर्नाटकात गेला होता. हा धोका टाळण्यासाठी यावर्षीचा हंगाम १ ऑक्टोबर पासून सुरू व्हावा असा पश्चिम महाराष्ट्रातील बहुराज्य साखर कारखान्याच्या नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे.

पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भूमिका या प्रादेशिक वादाबाबत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात महापुराचे गडद सावट कायम आहे. तेथे कारखाने लवकर सुरू होतील असे वाटत नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील बहुराज्य साखर कारखान्यांनी १ ऑक्टोबर पासून हंगाम सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. कर्नाटकात ऊस जाण्याची दरवर्षाची स्थिती पाहता त्यांची भूमिका गैर दिसत नाही. तथापि, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांच्यात यावरचेच हंगाम कधी सुरू करायचा याबाबत एकवाक्यता दिसत नाही. तथापि, याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत सर्वसमावेशक कोणता निर्णय होतो हेही पाहणे गरजेचे आहे. – पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ