जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे लादण्यात आलेले निर्बंध सैल झाल्याने यंदाच्या वर्षी सर्व उत्सवांना मोकळी सूट मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडी पाठोपाठ गणेशोत्सवातही दिवस-रात्र विविध मंडळांना भेट देत गणेश दर्शनाचा धडाका लावला. मुंबई, ठाण्यापासून थेट पुण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांचा ताफा वेगवेगळी गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या दर्शनासाठी दिवस-रात्र हिंडू लागल्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांनीही त्यापासून योग्य तो बोध घेत गणेशभक्तीचे ’दर्शन समाजमाध्यांवरून घडवण्यास सुरुवात केल्याने यंदाचा गणेशोत्सव राजकीय नेत्यांच्या भक्ती पर्यटनाचा ठरला आहे.

हेही वाचा… राहुल गांधींसह जणू ‘एक गाव’ दीडशे दिवस भारत जोडोच्या यात्रेवर!

राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा धागा पकडत पुढील राजकारणाची पद्धतशीरपणे मांडणी सुरू केली आहे. करोनाची साथ पूर्ण नियंत्रणात असल्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरली आहे. श्रावण महिन्यात सुरू झालेल्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दहिहंडीच्या निमीत्ताने या शिंदे-फडणवीस या दोन्ही नेत्यांनी हिंदुत्वाचा नारा जोरकसपणे देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील सत्ताबदल हा हिंदुत्वाच्या मुद्दयावर केल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे दहिहंडीच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच प्रमुख मंडळांना भेटी देत मुख्यमंत्र्यांनी केलेले दहीहंडी पर्यटन उत्सवप्रेमी भाविक मतदारांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. मुंबई, ठाण्यात फडणवीस हेही शिंदे यांच्यासोबत वेगवेगळ्या मंडळांना भेटी देताना दिसले. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमातही भाजप नेत्यांची उपस्थित लक्षवेधी ठरली. ‘राज्यात सत्ताबदल घडवित असताना आम्ही ५० थरांची हंडी मोठ्या धाडसाने फोडली’ हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यही यानिमित्ताने गाजले होते. दहिहंडीच्या निमित्ताने आखण्यात आलेली ही रणनिती गणेशोत्सवातही दोन्ही बाजूंकडून अंमलात आणली जात असल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

हेही वाचा… सार्वजनिक गणेश मंडळांना भाजपचे ‘सांस्कृतिक’ पॅकेज, महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून नवी क्लृप्ती

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई भाजपने राज्यातील सत्ता बदल आणि हिंदू सणांच्या उत्साहाचे ‘गणित’ जुळविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी मुंबई, ठाण्यापासून थेट पुण्यापर्यंत गणेश दर्शनाचा ठरवून धडाका लावला. त्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांनाही या वाटेने निघावे लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे गणेश दर्शन, भेटीगाठी आणि त्याचे होणारे चित्रीकरण पाहून मध्यंतरी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गणेश दर्शनाचा ‘शो’ सुरू असल्याचे टोले लगाविले होते. यापूर्वीही नेते गणेश दर्शनासाठी वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत असत. मात्र या नेत्यांमागे छायाचित्रकार आणि चित्रीकरणासाठी कॅमेऱ्यांची फौज नसायची अशी टिकाही अजितदादांनी केली होती. पण नंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि लालबागचा राजा गणेशोत्सवाला भेट दिली. तसेच नाना पाटेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शनही घेतले. या सर्वांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकवण्यात आले.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुणे आणि मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांना भेट देत दर्शन घेतले. आपल्या मतदारसंघात इस्लामपुरातही पाटील यांनी गणेश मंडळांना भेटी दिल्या. प्रत्येक दर्शनानंतर त्याबाबतचा फोटो माहिती समाजमाध्यमांवर टाकली. इस्लामपुरातील अशाच एका गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर टी शर्टवर अपना टाइम आएगा असे लिहिलेल्या एका लहान मुलीसोबत छायाचित्र काढत आणि ते समाजमाध्यमांवर झळकवत जयंत पाटील यांनी राजकीय संदेशही दिला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही गणेश मंडळांना भेटी दिल्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे घेतलेले दर्शनही नजरेत भरणारे ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देण्याचा धडाका लावला. आदित्य यांनी या भागातील काही घरगुती गणेशाचे देखील दर्शन घेतले. गेल्या काही वर्षात प्रथमच आदित्य इतक्या मोठ्या प्रमाणावर गणेश दर्शनासाठी मुंबई महानगर प्रदेशात फिरताना दिसले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही गणेश मंडळांना भेट दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to eknath shindes ganesh darshan campaign all party leaders started visiting ganesh mandals print politics news asj
First published on: 08-09-2022 at 16:39 IST