नागपूर : मित्र पक्षाच्या मानेवर पाय ठेवून सत्तेचे शिखर गाठणाऱ्या भाजपच्या बालेकिल्ल्यात (नागपुरात) बुधवारी २४ सप्टेंबरला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असून ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकणार आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला शिवसेना सोबत नको आहे, या पार्श्वभूमीवर शिंदे त्यांच्या नागपूर भेटीत स्वबळावर निवडणुकीची घोषणा करून बाणेदारपणा दाखवणार की भाजपच्या मागे फरफटत जाणारी भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

२४ तारखेला शिवसेना शिंदे गटाचा नागपूरमधील सुरेश भट सभागृहात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारावा हा या मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाला नागपुरात शक्तीप्रदर्शन करायचे आहे, रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीतून याचे स्पष्ट संकेत मिळाले.

बैठकीला पक्षाचे मंत्री आशीष जयस्वाल, उपनेते व विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांच्यासह पक्षाचे पूर्व विदर्भातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. ज्या पद्धतीने मेळाव्याची तयारी केली जात आहे, त्यावरून तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पूर्व विदर्भातील प्रचाराचा बिगुल शिंदे भाजपच्या बालेकिल्ल्यातून (नागपुरातून) फुंकणार असे दिसते.

मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपवर युतीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा या मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न दिसतो. पण मुळातच भाजप ही निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे. शिंदे गटाची जेमतेम ताकद लक्षात घेता त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी जागा सोडणे हे भाजपसाठी सोयीचे नाही.

भाजपसोबत शिवसेनाही सत्तेत आहे, पण सरकारी कार्यक्रमात, बैठकीत भाजपचे स्थानिक नेते सर्रास सहभागी होतात, पालकमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, पण या बैठकीत सेनेचा एकही स्थानिक नेता नसतो. यावरूनच सेनेबाबत भाजपची भूमिका काय हे स्पष्ट होते. आम्ही दिल्या तेवढ्या जागा स्वीकाराल तर युती अन्यथा स्वबळ असे सध्याचे भाजपचे धोरण आहे, या पार्श्वभूमीवर २४ तारखेला शिंदे नागपुरात येत आहेत. मेळाव्याला ‘ निर्धार मेळावा ’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यामेळाव्यात शिंदे कोणता निर्धार करतात ? भाजपसोबत फरफटत जाण्याचा की स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून बाणेदारपणाचा ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिदे गटापुढे पर्याय

शिवसेनेला विदर्भात विस्तार करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाला स्वबळाची घोषणा करून बाणेदारपणा दाखवणे आवश्यक आहे. तसे केल्यास स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करणे, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करता येईल, व भाजपवर दबाव आणून आम्हीही “आम्हीही ताकदवान आहोत.” हा संदेश देता येईल, पण पण जर शिंदे यांनी आम्ही “महायुतीतच लढणार” असे जाहीर केले तर तर ते भाजपच्या छायेतच राहतील.

भाजपमागे फरफटत जाणे, त्यांनी दिलेल्या जागांवर समाधान मानणे ,”महायुती”च्या नावाखाली आत्मसन्मान गमावणे हेच पर्याय शिल्लक राहतील, यातून कार्यकर्त्यांमध्ये निराशा वाढण्याची शक्यता आहे.

बावनकुळेंचा ५१ टक्केचा निर्धार

शिवसेनेचा निर्धार मेळावा बुधवारी होणार असला तरी त्यापूर्वीच म्हणजे रविवारी भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पक्ष कार्यकर्त्याच्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५१ टक्के मते घेऊन जिंकण्याचा निर्धार केला आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात ‘महायुती’ असा शब्दप्रयोग केला नाही. यातूनच भाजपची भविष्यातील नागपूर जिल्ह्यातील वाटचाल कशी असेल याचे संकेत मिळतात. हे येथे उल्लेखनीय.