अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाच जणांमध्ये पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहोळ यांच्या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोहोळ यांना बढती देऊन त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या खासदार गिरीश बापट यांना पक्षाने एक प्रकारे धक्काच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मोहोळ यांचा प्रदेश पातळीवरील राजकारणातील सक्रीय सहभाग पाहता बापट यांच्याऐवजी मोहोळ यांना लोकसभा निवडणुकीत पसंती दिली जाईल, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.

शहराचे माजी महापौर आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांची भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजक पदावर काही दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मोहोळ यांच्यावर नेत्यांच्या दौऱ्यांची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या नावाचा विचार लोकसभा निवडणुकीसाठी होणार नाही, अशी चर्चा तेव्हा भाजप वर्तुळात रंगली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबरच अन्य पक्षातील नेत्यांबरोबरचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबरचे त्यांचे निकटचे संबंध, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख असून करोना संसर्ग काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पार पाडलेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचा आवाका यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

हेही वाचा : उद्योग खात्यावरून उदय सामंत आणि शिवसेनेत जुंपली

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास मोहोळ यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ या इच्छुक आहेत. दोन वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान खासदार गिरीश बापट यांना पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बापट यांनी स्वपक्षावरच टीका केली आहे. पक्षावर नाराज असल्याची जाहीर कबुलीही त्यांनी दिली होती. त्यामुळे मोहोळ यांच्या नावालाच पसंती दिली जाईल, अशी चर्चा आहे. महापालिकेत २०१७ साली भाजपाची सत्ता आल्यानंतर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून ते ओळखले जातात. पुण्यातून बहुजन चेहरा पुढे करून राष्ट्रवादीला शह देण्याची भाजपची खेळी असू शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex mayor murlidhar mohol promoted candidate for mp from pune print politics news tmb 01
First published on: 18-09-2022 at 13:14 IST