गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी भाजपामध्ये नेत्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षातील नेते मंडळींनी भाजपाची वाट धरली आहे. मंगळवारी (१९ मार्च)भारताच्या माजी राजदूतांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम करणारे माजी आयएफएस अधिकारी तरनजीत सिंग संधू यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि एस जयशंकर हेदेखील माजी राजदूत आहेत.

कोण आहेत तरनजीत सिंग संधू?

संधू हे १९८८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. माजी काँग्रेस नेते व शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) संस्थापक सदस्य तेजा सिंग समुद्री यांचे ते नातू आहेत. १ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या आजोबांच्या जयंतीपासून त्यांनी अमृतसरमध्ये सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. संधू यांच्या आजोबांनी गुरुद्वारा सुधारणा चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती; यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगातही टाकले होते. आजोबांच्या नंतर संधू हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत, जे राजकारणात सामील झाले आहेत.

तरनजीत सिंग संधू यांचा जन्म २३ जानेवारी १९६३ मध्ये झाला. तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बाजवल्या. संधू यांनी पोखरण मिशनमध्येही काम केले. १९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर वॉशिंग्टन डीसीशी नवी दिल्लीचे बिघडलेले संबंध सुधारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेेन यांच्या भारत भेटीचे आयोजन करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१४ आणि २०१६ मध्ये मोदींच्या यूएस दौऱ्यांदरम्यानही संधू यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

तरनतारन जिल्ह्यातील राय बुर्ज हे संधू यांचे मूळ गाव आहे. संधू यांचे वडील बिशन सिंग समुद्री हे गुरु नानक विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू होते. त्यांनी अमृतसरमधील खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम केले होते. संधू यांची आई जगजीत कौर संधू यांनी अमेरिकेत डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण केले आणि अमृतसरच्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमनमध्ये प्राचार्य म्हणून काम केले. संधू यांचा विवाह नेदरलँडमध्ये भारताच्या राजदूत असलेल्या रीनत संधू यांच्याशी झाला आहे. रीनत संधू यापूर्वी इटलीमध्ये भारताच्या राजदूत होत्या.

हेही वाचा : भाजपाचा फॉर्म्युला ठरला; केंद्रीय मंत्री पशुपती पारस NDAतून बाहेर, पक्षाच्या अडचणी वाढणार?

भाजपामध्ये प्रवेश

संधू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्ष त्यांना अमृतसरमधून लोकसभा निवडणुकीत उभे करू शकतो, अशी शक्यता वर्तवली आत आहे. यापूर्वी या जागेवर माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, क्रिकेटर-राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू यांसारख्या उच्च-प्रोफाइल नेत्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानबरोबर पुन्हा व्यापार सुरू करण्यासंदर्भात संधू यांनी एक विधान केले होते. अमृतसरच्या आर्थिक विकासासाठी संधू यांची ही भूमिका महत्त्वाची ठरू शकते. आप-काँग्रेसवरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. अमृतसरमधून आपने कुलदीप धालीवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.