संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे आणि नागपूरमधील रस्ते विकासात महत्त्वाची भूमिका बजाविलेले निवृत्त सनदी अधिकारी टी. चंद्रशेखर गेली काही वर्षे आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहेतच. पण दोनच दिवसांपूर्वी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला व त्यांची या पक्षाच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ठाणे शहाराचा सारा कायापालट करण्याचे श्रेय थोटा चंद्रशेखर यांचे होते. घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण केल्याने गेल्या १५ वर्षांत नवे ठाणेच या परिसरात वसले आहे. नागपूर शहरातील रस्ते रुंदीकरणात चंद्रशेखर यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती. मुंबईत मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त व आधी सहआयुक्त म्हणून त्यांनी रस्ते सुधारले. विक्रोळी-जोगेश्वरी जोड मार्गाचे रुंदीकरण चंद्रशेखर यांनीच केले होते. मुंबईतील उपनगरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण, विमानतळाकडे जाणारे रस्त्यांची सुधारणा आदी कामे त्यांच्याच काळात झाली होती. कल्याण-डोंबिवलीमधील रस्ते त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात सुधारण्यात आले होते. अशा या धडाडीच्या अधिकाऱ्याने २००८ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर चंद्रशेखर यांनी तेव्हाच्या एकत्रित आंध्र प्रदेशात राजकारणात प्रवेश केला.

हेही वाचा… सांगलीत नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

चंद्रशेखर यांनी आधी चित्रपट अभिनेता चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षात प्रवेश केला होता. २००९ची लोकसभा निवडणूक त्यांनी गुंटूर मतदारसंघातून लढविली होती पण त्यांचा पराभव झाला होता. प्रजाराज्यम पक्षात काही काळ सक्रिय होते. २०१९च्या निवडणुकीपूर्वी चित्रपट अभिनेते पवन कल्याण यांच्या जना सेना पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. तेव्हाही त्यांच्या पदरी अपयशच आले होते. आंध्रच्या राजकारणात सध्या प्रचंड गर्दी खेचणारे पवन कल्याण यांचे चंद्रशेखर हे निकटवर्तीय मानले जातात.

हेही वाचा… जळगाव भाजपच्या खासदार व आमदारामधील मतभेद चव्हाट्यावर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. पक्षाचा विस्तार देशभर करताना त्यांनी आधी आंध्र प्रदेशमध्ये लक्ष घातले आहे. जनासेना पक्षाच्या चार नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. त्यात थोटा चंद्रशेखर यांचाही समावेश आहे. पक्षाने लगेचच चंद्रशेखर यांची भारत राष्ट्र समिती पक्षाच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

हेही वाचा… शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख वादातून कायम चर्चेत

सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यावर प्रजाराज्यम, जनासेना आणि आता भारत राष्ट्र समिती असा राजकीय प्रवास करणारे टी. चंद्रशेखर हे आधीच्या दोन पक्षांमधून निवडणुकीत पराभूत झाले. आता भारत राष्ट्र समितीकडून निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होतात का, हे आता बघायचे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former maharashtra cadre ias officer t chandrashekhar is now appointed andhra pradesh chief of bharat rashtra samithi party print politics news asj
First published on: 12-01-2023 at 14:05 IST