लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मालवण येथील पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडी सरकार महायुती सरकारला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी वादग्रस्त विधान केले. ‘महापुरुषांचे पुतळे मोडतोड झाल्यास दंगली होतात. गावे पेटतात. आणि इथे एवढे होऊन काहीच होत नाही.’ त्यांच्या या विधानाने शिवसेना शिंदे गटाला आयते कोलीत हाती मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाला महाराष्ट्र अशांत करायचा आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मालवण पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडीने मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्यासाठी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला. हुतात्मा चौकात प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांची जीभ घसरली. ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड होते. त्या ठिकाणी दंगली होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्यास गावच्या गावे पेटतात. मालवणात एवढे होऊनही सरकारच्या विरोधात कोणी काही बोलत नाही. सरकारच्या विरोधात बोलायचे नाही का? हे सरकार पदच्युत झाले पाहिजे होते. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही असे खैरे म्हणाले.