देगलूर ते नांदेड रस्त्यावर आज सकाळपासून एकच आवाज घुमत होता, नफरत छोडो, भारत जोडो.  लहान मुले, हातात काँगेसचा झेंडा नाचवत म्हणत होती, भारत जोडो, भारत जोडो. रस्त्यावर अबाल वृद्धांच्या तुफान गर्दीत  राहुल गांधी धीरगंभीरपणे चालत होते. सोबत चालणाऱ्या कधी, लहान मुलाला, कधी युवकाला, जवळ घेत, त्याच्या खांद्यावर हात ठेवत, यांच्याशी संवाद करत. निर्णायक युद्धाला निघालेल्या एखाद्या योद्ध्यासारखे ते पुढे जात होते आणि लोक त्यांच्या मागे चालत होते. 

हेही वाचा- ‘भारत जोडो’यात्रेत पूर्व नागपूरचे कार्यकर्ते गांधी टोपी घालून सहभागी होणार

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा दुसरा दिवस. सकाळी पदयात्रा सुरू झाली. दुपारी विश्रांती नंतर बरोबर चार वाजता पुन्हा यात्रा सुरू झाली. देगलूर ते बिलोली सुमारे दहा किलो मीटरचा रस्ता गर्दीने झाकून गेला होता. यात्रेत युवकांचा सहभाग मोठा होता. किमान चार ते पाच किलोमोटरपर्यंत गाड्या आणि माणसांची गर्दी दिसत होती. टाकळी नांदेड मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्ते, लहान मुले मोठ्या कुतूहलाने आपल्या पालकांसमवेत यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी जनसागर रस्त्यावर उतरला होता.

हेही वाचा- राहुल यांच्या यात्रेत महाराष्ट्रातून नऊ भारतयात्री

दुपारच्या कडक ऊन्हात रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला गर्दी पदयात्रेत सामील होण्याची वाट पाहत होती. ४ वाजून १० मिनिटांनी रस्त्यावर मंदगतीने सरकत असलेल्या गर्दीत राहुल गांधी यांचे आगमन झाले आणि गर्दीला जिवंतपणा आला. गर्दी नांदेडच्या दिशेने वेगाने सरकू लागली. रस्ता कमी पडू लागला तेव्हा राहुल गांधींच्या बरोबर चालण्यासाठी अनेकजण धावाधाव करत होते. टप्याटप्यावर “नफरत छोडो भारत जोडो” घोषणा देत पुरुष आणि महिलांचे छोटे मोठे समूह या गर्दीत सामील होत.

खतगाव हायस्कूलचे विद्यार्थी शालेय गणवेशात यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उभे होते. टाळ्यांचा कडकडाट करत “वेलकम सर… वेलकम सर” म्हणत काहीसे झुकून अभिवादन करत होते. त्यापुढे नऊवारी नेसलेल्या विद्यार्थीनी हातात तुळशी आणि घट घेऊन उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि घोड्यावर बसलेल्या तरुण तरुणींची शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यापुढे हातात टाळ चिपळ्यांच्या गजरात “जय जय रामकृष्ण हरी” गाणारा वारकरी भजनी समुदाय मोठ्या जोशात भजन गात होता.

एका मंचावर महाराष्ट्रातील  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अशा थोर पुरुषांच्या वेशभूषेत महाराष्टातील सांस्कृतीचे दर्शन घडवले जात होते.

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त कोल्हापुरात विशेष तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदयात्रा भोपळ्याच्या टेकडीला आली तेव्हा यात्रेच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वारांनी लक्ष वेधून घेतले. पदयात्रा जवळ येताच वेगवान घोडेस्वारी करत, “जय भवानी जय शिवाजी” असा त्यांनी जयघोष केला. यात्रा पुढे सरकत असताना हे घोडेस्वारसुद्धा साहसी कसरती करून लक्ष वेधत होते. तर एके ठिकणी सनई डफली आणि ताशाच्या पारंपरिक वाद्यांनी एक वृद्ध वाजंत्री गट सर्वांचे स्वागत करत होता. 

बिजूर येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरात, राहुल गांधी गेले, शेतकरी कुटुंबियांसोबत त्यांनी चहा घेतला, दहा पंधरा मिनिटे त्यांच्याशी बोलले आणि पुन्हा यात्रा सुरू झाली. सायंकाळी साडेसात वाजता शंकर नगर येथे राहुल गांधी यांची चौक सभा झाली आणि आजच्या पदयात्रेचा समारोप झाला.