Pooja Pal suspension उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करणाऱ्या महिला आमदारावर समाजवादी पक्षाने कारवाई केली. काही दिवसांपूर्वी आमदार पूजा पाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. समाजवादी पक्षाने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला. त्यांना अनेकदा नोटीस पाठवूनदेखील त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरू ठेवल्याचा आरोप पक्षाने एका पत्रकात केला आहे. मुख्य म्हणजे हकालपट्टीचा आदेश असलेल्या या पत्रकावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची स्वाक्षरी आहे. पूजा पाल यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रित केले जाणार नसल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. मात्र, आता पूजा पाल यांनी पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या नक्की काय म्हणाल्या? अखिलेश यादवांवर आरोप करण्यामागील कारण काय? जाणून घेऊयात.

पूजा पाल यांचे आरोप काय?

  • चैल विधानसभा मतदारसंघातील आमदार पूजा पाल यांनी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना पत्र लिहून, जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप केला आहे.
  • जर त्यांची हत्या झाली, तर त्याला अखिलेश यादव आणि त्यांचा पक्ष जबाबदार असतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
  • गुंड-राजकारणी अतिक अहमदच्या मृत्यूनंतर महिलांना न्याय दिल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते.
  • त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
पूजा पाल तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

पूजा पाल यांनी पत्रात काय म्हटले?

पूजा पाल तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांना मतदान केल्याचेही म्हटले जाते. २००५ साली त्यांचे पती तत्कालीन बहुजन समजवादी पक्षाचे (बसपा) आमदार राजू पाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ती हत्या गुंड-राजकारणी अतिक अहमदच्या आदेशावरून झाली होती, असा आरोप आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आपलीही हत्या होऊ शकते, अशी भीती पूजा पाल यांनी व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी दावा केला आहे की, पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.

“तुम्ही माझा अपमान केला आणि मला एकटे पाडले. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचे धाडस वाढले आहे. माझ्या नवऱ्याप्रमाणे माझाही खून होऊ शकतो. जर असे घडले, तर त्याला समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांना जबाबदार धरले जावे, अशी माझी सरकारला विनंती आहे,” असे पत्रात म्हटले आहे. पूजा पाल यांनी समाजवादी पक्षावर जात-आधारित पक्षपात आणि न्यायासाठी त्यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या लढ्यात त्यांना पाठिंबा न दिल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, गुन्हेगारांविरुद्धच्या लढ्यात पाठिंबा मिळेल या आशेने त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या होत्या; पण अखेरीस त्यांना बाजूला सारून, शांत करण्यात आले आणि त्यांच्या हाती निराशा आली.

पूजा यांनी असा दावा केला की, त्यांनी अनेक वर्षे पक्षात त्रास सहन केला. त्यांची बाजू मांडण्याची संधी न देताच त्यांची हकालपट्टी करण्यात आली. “मला हे माझ्यावर अन्याय झाल्यासारखे वाटले,” असे त्यांनी लिहिले. योगी आदित्यनाथ यांच्या कौतुकाचा निषेध का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी पत्रात विचारला आहे. “एका अत्यंत मागास जातीच्या विधवेला तिच्या पतीला न्याय देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानल्याबद्दल शिक्षा दिली जाते; पण तुम्ही किंवा तुमच्या पत्नीने कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना मतदान केल्यास, ते योग्य ठरवले जाते,” असे त्यांनी पुढे लिहिले. पूजा पाल यांनी आपल्या पत्राचा शेवट अभिमानाचा संदेश देऊन केला. त्या म्हणाल्या, “माझे ध्येय साध्य झाले आहे, माझ्या पतीच्या हल्लेखोरांना शिक्षा मिळाली आहे. आता जरी माझा मृत्यू झाला तरी मी अभिमानाने मरेन,” असे त्यांनी लिहिले.

पूजा पाल कोण आहेत?

आमदार पूजा पाल या बहुजन समाजवादी पार्टीचे दिवंगत आमदार राजू पाल यांच्या पत्नी आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चैल विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी पूजा यांनी शिक्षणाबरोबर अनेक लहान-मोठी कामे केली. त्यांनी खासगी कार्यालये, रुग्णालये यांच्यासह घरांमध्ये साफसफाईचे काम केले. रुग्णालयात काम करत असतानाच त्यांची ओळख बहुजन समाज पक्षाचे नेते राजू पाल यांच्याशी झाली. त्यांनी १६ जानेवारी २००५ रोजी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसांतच त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पतीची राजकीय परंपरा पुढे नेण्याची शपथ घेतली.