अमरावती : अनियमित पावसामुळे खरीप हंगामात झालेले शेतीचे नुकसान, रब्‍बीच्‍या सुरूवातीलाच अवकाळी पावसाचा तडाखा, नुकसानभरपाईच्‍या वाटपातील दिरंगाई, शेतमालाचे घसरलेले दर असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्‍या ‘युवा संघर्ष यात्रे’च्‍या माध्‍यमातून ऐरणीवर आले आहेत. या यात्रेत काँग्रेस आणि शिवसेनेच्‍या नेत्‍यांचाही सहभाग लक्षवेधी ठरला आहे.

महाराष्‍ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आमदार रोहित पवार यांनी तरूणांचे, बेरोजगारांचे मुद्दे घेऊन युवा संघर्ष यात्रा सुरू केली. २४ ऑक्‍टोबरपासून पुणे येथून सुरू झालेली ही यात्रा तब्‍बल ८०० किलोमीटरचा प्रवास करून १२ डिसेंबरला नागपूर येथे पो‍होचणार आहे. ही यात्रा अमरावती जिल्‍ह्यात पोहचल्‍यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यात्रेत सहभागी झाले, तर नांदगाव खंडेश्‍वर येथे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांनी यात्रेचे स्‍वागत करून महाविकास आघाडीतील एकजुटीचे संकेत दिले. वाशीम, अमरावती जिल्‍ह्यातून पायी चालत असताना रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी अमरावतीत मोर्चा काढला. विदर्भातून प्रवास करताना शेतीच्‍या प्रश्‍नांना प्राधान्‍य देण्‍याचा राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांचा प्रयत्‍न आहे.

हेही वाचा : पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात स्वपक्षीयांचीही नाराजी !

राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये फुटीनंतर पहिल्‍या फळीतील नेतृत्‍वाची पोकळी आहे. अनेक जण अजित पवारांसोबत गेले आहेत. अमरावती जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादीचे नेते संजय खोडके हे अजित पवार गटात आहेत. हर्षवर्धन देशमुख यांच्‍यासह काही नेते शरद पवारांसोबत असले, तरी नवीन नेतृत्‍वाला ताकद देण्‍याचा राष्‍ट्रवादीचा प्रयत्‍न आहे. या निमित्‍ताने राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये आलेली मरगळ झटकण्‍याचे प्रयत्‍न होताना दिसत आहेत.

यात्रांमुळे जोडले जाणारे लोक आणि मिळणारा प्रतिसाद हा यापुर्वीच्‍या अनेक राजकीय यात्रांमधून सिद्ध झालेला आहे. महाराष्‍ट्रात राहुल गांधींच्‍या भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. या पार्श्‍वभूमीवर राष्‍ट्रवादीने गावा-गावांमधून प्रवासाचे नियोजन केले. अनेक ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्‍या. पक्षाचा झेंडा जरी नसला, तरी राष्‍ट्रवादीचा पक्ष बांधण्‍याचा प्रयत्‍न या निमित्‍ताने होताना दिसत आहे. अमरावतीच्‍या मोर्चात राष्‍ट्रवादीचे पवार गटाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, महिला आघाडीच्‍या प्रदेशाध्‍यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रेखा खेडेकर, गुलाबराव गावंडे यांच्‍यासह अनेक नेते सहभागी झाले. या निमित्‍ताने शरद पवार गटाने आपली शक्‍ती दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. रोहित पवार यांनी अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्‍हाध्‍यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची स्‍वतंत्र बैठक अमरावतीत घेतली. पक्षसंघटनात्‍मक बांधणीच्‍या दृष्‍टीने ही तयारी होती.

हेही वाचा : कन्या प्रणितीसाठी सुशीलकुमार शिंदे झाले सक्रिय !

रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांसोबत बेरोजगारांचे प्रश्‍न समोर आणले आहेत. अडीच लाख रिक्‍त पदांची भरती करणे, अवाजवी परीक्षा शुल्‍काच्‍या माध्‍यमातून होणारी वसुली थांबवावी, अतिरिक्‍त परीक्षा शुल्‍क परत करावे, पेपरफुटीच्‍या विरोधात कडक कायदा करावा, नोकरभरतीतील भ्रष्‍टाचार रोखणे, सर्व भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करावी, औद्योगिक विकासाला चालना मिळावी, अशा अनेक मागण्‍या यात्रेतून मांडण्‍यात आल्‍या आहेत.

हेही वाचा : अभाविप ते काँग्रेस प्रवास करणारे रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘युवा संघर्ष यात्रे’दरम्यान नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण आरोग्य केंद्राला रोहित पवार यांनी भेट दिली. कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस, खोकल्याचे औषध, अँटीबायोटिक्स अशा प्रकारची अनेक औषधे या ठिकाणी कित्येक महिने मिळत नाहीत, अशा तक्रारी समोर आल्‍या. आरोग्‍य व्‍यवस्‍थेतील उणिवांवर बोट ठेवत सरकारला कोंडीत पकडण्‍याचा प्रयत्‍न रोहित पवारांनी केला. यात्रेदरम्यान अंगणवाडी सेविकांनी भेट घेऊन अंगणवाडी सेविकांच्या विविध समस्या सांगितल्या तसेच त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन इत्यादी विषयांबाबत रोहित पवारांशी सविस्तर चर्चा केली, काही ठिकाणी आदिवासींनी त्‍यांचे प्रश्‍न मांडले. अशा वंचित घटकाना जोडण्‍याचे प्रयत्‍न यात्रेतून दिसून आले. अनेक मुद्यांना स्‍पर्श करीत लोकांमध्‍ये जाण्‍याचा हा प्रयत्‍न कितपत यशस्‍वी ठरतो, हे येत्‍या काळात दिसून येणार आहे.