scorecardresearch

गुजरातमध्ये ‘आप’ ची जोरदार तयारी, विधानसभेसाठी केली दुसरी उमेदवार यादी जाहीर

गुजरातमधील भाजप आणि काँग्रेससह अन्य कोणत्याही पक्षाने आतापर्यंत कोणतीही नावे जाहीर केलेली नाहीत. या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत.

गुजरातमध्ये ‘आप’ ची जोरदार तयारी, विधानसभेसाठी केली दुसरी उमेदवार यादी जाहीर

आम आदमी पार्टीने गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमधील नऊ मतदारसंघांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. गुजरातमधील भाजप आणि काँग्रेससह अन्य कोणत्याही पक्षाने आतापर्यंत कोणतीही नावे जाहीर केलेली नाहीत. या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत.

आपच्या दुसऱ्या यादीत सुरेंद्रनगरमधील चोटिला मतदारसंघातील राजू करपडा यांचा समावेश आहे; जुनागडमधील मंगरूळ मतदारसंघातून पियुष परमार, जामनगर उत्तर मतदारसंघातून करसनभाई करमूर, राजकोटमधील गोंडल मतदारसंघातून निमिषा खुंट, सुरतमधील चोर्यासी सीटवरून प्रकाशभाई कॉन्ट्रॅक्टर, मोरबीतील वांकानेर मतदारसंघातून विक्रम सोराणी, दाहोदमधील देवगडबरिया मतदारसंघातून भरत वखाला, अहमदाबादमधील असरवा मतदारसंघातून जे जे मेवाडा, आणि राजकोटमधील धोराजी मतदारसंघातून विपुल सखिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ‘आप’ने यापूर्वी १० नावांची यादी जाहीर केली होती, त्यामुळे आता १८२ पैकी १९ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.

अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत नावांची घोषणा करताना, आप गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया म्हणाले “गुजरातमध्ये आप दिवसेंदिवस मजबूत होत आहे. अरविंद केजरीवाल यांनी १० लाख नोकऱ्या, ३०० युनिट मोफत वीज किंवा मोफत शिक्षण या आश्वासनांमुळे जनता उत्साहित आहे. आमच्या पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष म्हणून आम्ही आज येत्या निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.”

इटालिया पुढे म्हणाले की त्यांनी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांना भाजपमधील लोकांकडूनही अभिनंदनाचे कॉल आले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की निवडणुकीच्या चार-पाच महिने अगोदर यादी जाहीर करणे हा अत्यंत योग्य निर्णय आहे जेणेकरून उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.” पहिल्या यादीत चार नेते पूर्वी भाजप किंवा काँग्रेसचे होते, तसेच जातीय गटांचे मिश्रण होते. दुसऱ्या यादीत दिग्गजांची संख्या कमी आणि शेतकरी आणि कार्यकर्ते नेते जास्त आहेत. ‘आप’ने उमेदवार जाहीर करताना इतर पक्षांना मागे टाकल्याबद्दल विचारले असता, गुजरातचे काँग्रेस प्रभारी रघु शर्मा यांनी गुरुवारी सांगितले “काँग्रेस देखील निर्धारित वेळेपूर्वी आपल्या उमेदवारांची नावे देईल.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या