हिंगोली : नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भाऊबीज म्हणून वाटप केलेल्या साड्यांची विरोधकांनी होळी केली. साडी घेणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये टाकण्यावरून मतदारांचा अपमान केला जात असल्याचा आक्षेप भाजपकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे वस्त्रहरणाचे प्रयोग सुरू झाले आहेत.

तान्हाजी मुटकुळे यांनी तर मटका, गुटखा, वाळूचे अवैध धंदे करणाऱ्यांना जनता धडा शिकवील, अशी टीका नाव घेता अलीकडेच केली. या टीकेला उत्तर न देता आमदार बांगर यांनी मात्र विविध पक्षातील कार्यकर्ते आपल्या बाजूने ओढण्यास वेग दिला. त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश दिला. मागच्या वेळी भाजपने राष्ट्रवादीला पराभूत करून हिंगोलीचे नगराध्यक्षपद काबीज केले होते. यावेळी या पदावरच शिंदे गटाने दावा केला आहे. आमदार बांगर यांचे मोठे बंधू श्रीराम बांगर यांच्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यामुळेच साड्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे हिंगोलीमध्ये येत आहे.

बांगर स्वत: घरोघरी जाऊन साड्या वाटप करत आहेत. यावरून राजकीय चिखलफेक वाढली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आक्रमक होत साड्यांची होळी केली. त्यानंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. या प्रकरणी आता आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जनतेच्या भावनेलाच हात घातला. शिंदे सेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर व त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांनी साड्या वाटप करतानाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याने सामान्यांच्या भावनांशी खेळ सुरू केल्याचा आरोप केला. लोकांना कमी लेखून एकप्रकारे हीनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप मुटकुळे यांनी केला. या साड्यांसाठी मटका, गुटखा, वाळू, दारूचा पैसा वापरला याची जाणीव जनतेला आहे. हे लोक कोण आहेत, कसे आहेत, हे जनता ओळखून आहे, असे मुटकुळे म्हणाले.