कोल्हापूर : लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी दौरा असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर भेटीपूर्वी करण्यात आला होता. दिवसभराच्या चर्चा, बैठका, कार्यक्रम होऊनही महाविकास आघाडीतील उमेदवारीची अनिश्चितता कायम राहिली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता या दौऱ्याने वाढली असली तरी त्यांच्या उमेदवारीबद्दल पवारांनी सुरुवातीला व्यक्त केलेले आश्चर्य हेही उल्लेखनीय ठरले.
जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत केवळ चर्चा होत आहे. अनेक नावे पुढे येत असली तरी कोणत्याही नावावर एकमत होताना दिसत नाही. कोल्हापूरसाठी गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे शाहू महाराजांसाठी आग्रही दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनीही पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवू असे सांगितले आहे. ठाकरे सेनेकडून संजय पवार, विजय देवणे, संजय घाटगे ही नावे चर्चेत आहेत.तथापि, आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना अजूनही तगड्या उमेवाराचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : कोकणात भाजपाची वर्चस्वाची, तर शिंदे गटाची अस्तित्व टिकवण्याची लढाई
छत्रपतींकडे चाचपणी
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याला महत्व आले होते. शहरात येताच त्यांनी सर्वात आधी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली. बंद दाराआड तासभर चर्चा झाली. तरीही उमेदवारी बाबतचे संशयाचे धुके कायम राहिले. प्रसार माध्यमांनी त्यांना शाहू महाराज उमेदवार असणार का, अशी विचारणा केली असता पवार यांनी सुरुवातीलाच मी कोल्हापुरात इतके वेळ येतो पण ते निवडणूक लढवणार आहेत असे काही पहिल्यांदाच समजले आहे, असे म्हणताना त्यांचे उमेदवारी बाबत कानावर हात ठेवणे आश्चर्यकारक होते. हा निर्णय माझा एकट्याचा नाही. महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेईल. तरीही ते उमेदवार असतील तर मला आनंदच होईल, अशा शब्दात पवार यांनी उत्तराचा शेवट केला. त्यांचे अखेरचे शब्द गृहीत धरता शाहू महाराज हे माविआचे उमेदवार असतील असा निष्कर्ष काढला जात आहे. प्रत्यक्षात शाहू महाराजांना निवडणुकीत कितपत रस आहे, मविआच्या कोणत्याही पक्षाकडून चिन्हावर लढण्यासाठी निमंत्रित संभाजीराजे छत्रपती यांनी निमंत्रित केले असताना ते आघाडीकडून कि स्वराज्य करून रिंगणात उतरणार असा साराच संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर नेमका कोणता निर्णय होणार याचे कुतूहल आहे.
हेही वाचा : अकोल्यात भाजपची उमेदवारी कोणाला ?
कोल्हापुरातील कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाले.भाकपचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पवार यांनी पानसरे कुटुंबीयांशी चर्चा करून संवाद साधला. यावेळी पवारांनी देशांमध्ये वाढणाऱ्या उजव्या प्रतिगामी शक्तीला रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने जाणाऱ्या पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
हेही वाचा : मनोहर जोशी : सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले नेते
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिली जाणार का अशी विचारणा केली. याबाबत चर्चा सुरू आहे. ते आघाडीचे उमेदवार असतील असे थोरात यांनी कोल्हापुरात सांगितले. याचवेळी इकडे शेट्टी यांनी शरद पवार यांच्या दौऱ्या दिवशी आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगून टाकले. तर स्वाभिमानी पक्षाचे नेते प्रा. जालिंदर पाटील यांनी राज्यात आठ लोकसभा मतदारसंघात पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे घोषणा करून संभ्रम वाढविला.