कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु असताना कोल्हापुरात झालेल्या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीतील पहिल्याच मेळाव्यात १० पैकी ५ जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार आणि मविआ अंतर्गत समन्वय कसा राहणार, असा वादाचा मुद्दा उपस्थित होत आहे .
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्षांनी सुरुवात केली आहे. कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आपले अस्तित्व पुन्हा ठळक करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वीच जिल्हा उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ५ जागा लढवणार असल्याचे म्हटले होते. रविवारी ठाकरे सेनेच्या वतीने जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या चर्चेवर भर राहिला.
हेही वाचा : जनसुरक्षा कायदा अध्यादेशाद्वारे? विरोधकांच्या आक्षेपामुळे विधिमंडळात मंजूर करण्यात अडचणी
शिवसेना कोल्हापूरची जबाबदारी आता पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय नेते आमदार भास्कर जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी पहिल्याच मेळाव्यात कोल्हापुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच ५ जागा लढवणार असल्याचे घोषित केले. मतदारसंघ कोणते यावर भाष्य करण्यात आले नाही. इच्छुकांची वाढती संख्या आणि शिवसेनेच्या निरीक्षकांनी मतदारसंघ निहाय जाऊन घेतलेला आढावा पाहता काही मतदारसंघात शिवसेनेचा दावा ठळक होऊ लागला आहे. त्यानुसार कोल्हापूर उत्तर मध्ये संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, हातकणंगले राखीव मतदार संघात माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कागल मध्ये माजी आमदार संजय घाटगे वा त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे, शाहूवाडी मध्ये माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या नावाला प्राधान्य आहे. राधानगरी व शिरोळ या मतदारसंघात नाव निश्चितीच्या हालचाली आहेत. चंदगड मध्ये जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, मुस्लिम समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते रियाज समनजी ही नावे शिवसेनेच्या यादीमध्ये आहेत. कालच्या दौऱ्यावेळी आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी इच्छुकांकडून आणखी तपशील मागवलेला आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा होणार असून या नावांबाबत पुन्हा विचार केला जाणार आहे.
हेही वाचा : अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण
भास्कर जाधव यांनी कोल्हापूरचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या विषयी सकारात्मक प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून ऐकायला मिळाल्या. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन संवाद साधण्याच्याची त्यांची कार्यशैली शिवसैनिकांना भावलेली दिसते. या दौऱ्यात जाधव यांनी शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणावे असे निक्षून सांगितले. कोल्हापूर शहरात पूर्वी जिल्हाप्रमुख – माजी आमदार यांच्यात टोकाचा वाद होता. शिवसेनेत फूट झाल्याने हा वाद आत संपुष्टात आला आहे. चंदगड मध्ये जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांमध्ये जुना – नवा असा वाद असून त्यावर जाधव यांना मात्रा काढावी लागणार आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राहण्याचा संदेश भास्कर जाधव, अरुण दुधवडकर यांनी दिला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या उपस्थितीत मनसेसह करवीर, उत्तर, दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करत बेरजेचे राजकारण केले.