छत्रपती संभाजीनगर : सुभाष मुळे गुरुजींचा दूरध्वनीला गेल्या दोन दिवसापासून तशी उसंत नाही, कारण निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा मुहुर्त ते अनेकांना सांगत होते. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राहूकाळ, उमेदवाराचे गुरुबळ, राहुचा होरा असे शब्द ते उच्चारत निवडून येण्याचा सल्ला देत होते. ते म्हणाले, ‘ शिवसेने दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटातील उमेदवारही मुहुर्तासाठी विचारणा करीत आहेत. आम्ही ते सांगतो. काही वेळा यश मिळविण्यासाठी अनुष्ठानेही करतो.’ निवडणुकीच्या लगबगीत आता मुहुर्ताला पोहचण्याचे नियोजन केले जात आहे.

बहुतांशी सर्व मतदारसंघातील उमेदवारांना आता मुहुर्त कळवून झाला आहे. ४ एप्रिल रोजी सकाळचा वेळ चांगला आहे. या काळात फक्त मुहुर्त विचारले जात नाही तर राजकीय यश मिळावे म्हणून वेगवेगळी अनुष्ठाने आणि यज्ञही केले जात आहेत. चंद्र बल आणि गुरू बल चांगले असणाऱ्यांना यश मिळते. काही वेळा आम्ही तंत्रोपसना करतो. अलिकडच्या काळात देशातील भाजपच्या एका मोठ्या नेत्यासाठी विचित्र हनुमान अनुष्ठानही केले होते. नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी होमही केले जात आहेत. एका बाजूला मुहुर्ताची लगबग सुरू असतानाच वास्तूशास्त्रानुसार घर बांधकामामध्ये सुधारणा करुन घेण्याचाही सपाटा सुरू होता. छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तू विशारद म्हणून काम करणारे शौनक कुलकर्णी म्हणाले, ‘ आता बहुतांश बांधकामे वास्तूशास्त्राप्रमाणेच करण्याचा कल आहे. ज्यांना वास्तू दोष आहे असे सांगितले ते असे बदल करतात. घराची दारे बदलण्यापासून ते झोपण्याच्या दिशाही ठरविल्या जातात. गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांच्या घरातील बदल नक्कीच या स्वरुपातील आहेत.’

हेही वाचा : ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुलदैवताचे दर्शन घ्यायलाही नेते आवर्जून जातात. नारायण राणे यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले. नांदेडचे प्रताप चिखलीकर साईबाबाचे भक्त आहेत. कॉग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकर तर परभणी जिल्ह्यातील त्रिधारा या ठिकाणास आवर्जून दर्शनाला येत. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनचे उमेदवारी मिळालेले चंद्रकांत खैरे तर दिवसभरातून एकदा तरी खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन येतात. ते अगदी दिवसभरातील राहू काळही टीपून ठेवतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुतांश आमदार मुहुर्त साधूनच कामे आखतात. निवडणुकीच्या काळात बाबा, गुरुजींना चांगले दिवस आले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी कधीचा मुहुर्त चांगला आहे हा मुहुर्त आधीच काढून ठेवला आहे.